Details of BJP MLA Pritam Lodhi Son Thar Accident and the heated exchange with Shivpuri police officials : मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील एक अपघात सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या अपघाताने आता राजकीय सत्ता आणि पोलीस यांच्यातील वादाचे रुप घेतले आहे. या वादाच्या केंद्रस्थानी भाजपाचे आमदार प्रीतम लोधी हे आहेत. लोधी यांचे सुपुत्र दिनेश लोधी यांनी करेरा येथे भरघाव कारने पाच जणांना उडवल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात भाजपा आमदार लोधी यांनी अचानक यू-टर्न घेतला असून पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

१६ एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर लगेचच लोधी यांनी तात्काळ या प्रकरणात जबाबदार अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले होते की, “एका आमदारासाठी त्याचा मुलगा किंवा कुटुंब प्रथम नसते. तर जनता ही सर्वोपरी आहे. पोलीस प्रशासनाने करेरा येथील पीडितांना न्याय मिळवून दिला पाहिजे.” त्यांच्या या विधानाचे कौतुक होत असतानाच अवघ्या काही दिवसांतच त्यांनी आपली भूमिका बदलल्याचे पहायला मिळत आहे.

लोधी यांनी अचानक पोलिसांविरोधात कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. लोधी यांनी करेराचे सब-डिव्हिजनल ऑफिसर ऑफ पोलीस (एसडीओपी) आयुष जाखर यांच्यावर कठोर शब्दात टीका करत थेट इशारा दिला आहे. ज्यामुळे प्रशासनाला चांगलाच धक्का बसला आहे. “करेराच्या एसडीओपी यांनी जे काही म्हटले आहे ते मला सहन होत नाहीये. त्यांनी माझ्या मुलाला पुन्हा इथे न दिसण्याबाबत इशारा दिला. मला एसडीओपींना विचारायचे आहे की, करेरा काय तुमच्या वडिलांचे आहे का? सामान्यपणे मी असे बोलत नाही, पण आता मला हे स्पष्ट करायचे आहे की… माझा मुलगा करेरामध्ये परत येईल आणि तो निवडणूकही लढवेल. तुमच्या वडिलांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी त्याला रोखून दाखवावे.”

इतकेच नाही तर लोधी यांनी तपासाला देखील आव्हान दिले आणि प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला. “मी एसडीओपी यांना आमच्या इतिहासाची आठवण करून देऊ इच्छितो. जर तुम्ही आमच्यावर खोटे आरोप केले, अनुचित दबाव टाकला किंवा पूर्वग्रह ठेवून तपास केला, तर आम्ही ते खपवून घेणार नाही आणि तुम्हाला नक्कीच योग्य असे उत्तर देऊ. मला अशा अधिकाऱ्यांना सांगायचे आहे की तुमच्या मर्यादेत राहा, तुमच्या अधिकारक्षेत्रात राहा.”

आमदार लोधी यांनी या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला आणि असा आरोप केला की, काँग्रेसने हा अपघात वाढवून सादर केला आहे. त्यांनी असा दावाही केला की, यापूर्वी झालेल्या अनेक अपघातांमध्ये साधी प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली नव्हती.

नेमकं काय झालं होतं?

१६ एप्रिल रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास तक्रारदार संजय परिहार, आशिष परिहार आणि अंशुल परिहार यांच्यासह दुचाकीवरून तहसील कार्यालयाकडे जात होते. त्यांच्या पुढे सीता वर्मा आणि पूजा सोनी या दोन महिला रस्त्यावरून चालत जात होत्या. एफआयआरनुसार, दिनेश लोधी यांनी काळ्या रंगाची थार SUV अत्यंत वेगात आणि निष्काळजीपणे चालवत आधी त्या दोन महिलांना धडक दिली आणि त्यानंतर दुचाकीला जोरात धडक दिली, ज्यामध्ये पाचही जण जखमी झाले.

जेव्हा जबाब घेण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा भाजपा आमदार सुपुत्र ज्या थार एसयूव्हीने पाच जणांना उडवले होते, त्याच गाडीतून तो करेरा पोलीस ठाण्यात पोहोचला. विशेष म्हणजे, त्या गाडीला नंबर प्लेट नव्हती, काचांवर बेकायदेशीर काळी फिल्म लावली होती आणि त्यावर ह्युटरदेखील बसवलेले होते. पोलिसांनी याप्रकरणी दंड ठोठावला तरी त्याच्या वागण्यात कोणताही बदल दिसून आला नाही.

चौकशीदरम्यान दिनेश लोधी यांनी दावा केला की, त्यांनी वारंवार हॉर्न वाजवला आणि इतकेच नाही तर सायरन देखील वाजवले, पण त्या लोकांनी वाट दिली नाही आणि ओव्हरटेक करतेवेळी अपघात झाला. दरम्यान पोलीस तपासणीत असे दिसून आले की, वाहनावर ह्युटर बसवलेले होते आणि खिडक्यांवर बेकायदेशीर डार्क फिल्म लावली होती. या दोन्ही गोष्टी मोटर वाहन कायद्यांतर्गत उल्लंघन ठरतात. वाहन सोडण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला.

आमदारांनी स्वतःचा बचाव करताना दावा केला की, कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई होईल. त्यांनी नमूद केले की, एसपींशी बोलल्यानंतर त्यांनीच एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी मदत केली, वाहन पोलीस ठाण्यात पाठवण्याची व्यवस्था केली आणि आपल्या मुलाला चौकशीसाठी पाठवले.

मात्र , या घटनेतील पीडित मात्र वेगळेच बाजू मांडत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या पीडितांनी आरोप केला की आमदार किंवा त्यांच्या मुलाने अपघातानंतर त्यांच्यासाठी जराही काळजी दाखवली नाही. “आम्ही कसे आहेत हे विचारायला देखील कोणी आले नाही,” असे एका पीडित व्यक्तीने सांगितले.