नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गरबा उत्सवात मुस्लिमांच्या प्रवेशावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. मध्य प्रदेशातील भोपाळच्या हुजूर मतदारसंघाचे भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी गरब्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मुस्लिम मुलांनी गरब्याला एकटे येऊ नये, त्यांनी सोबत आपल्या बहिणी आणि मुलींनाही आणावे. आमचे तरुणही तयार आहेत,” असे विधान शर्मा यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाने भाजपवर जोरदार निशाना साधला आहे.
भाजपा आमदार नेमकं काय म्हणालेत?
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना आमदार रामेश्वर शर्मा यांनी गरबा आयोजनातील मुस्लिमांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले. “मुस्लिम मुलांना गरब्यात एकटेच का यायचे असते? त्यांनी एकटे येऊ नये, तर आपल्या बहिणी-मुलींनाही सोबत आणावे. आमचे तरुणही तयार आहेत,” असे म्हणत त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली. एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले, “जर मुस्लिमांना कायमस्वरूपी हिंदू धर्मात सामील व्हायचे असेल, तर आमची त्यालाही तयारी आहे. या, ‘जय श्री राम’ म्हणा आणि कपाळाला टिळा लावा; कोणाचीही त्याला हरकत असणार नाही.”
‘लव्ह जिहाद’वरून थेट इशारा
गरबा उत्सवाचे ‘तमाशात’ रूपांतर करू नका, असा इशारा देत आमदारांनी पुढे म्हटले, “जर गरब्याचे तमाशात रूपांतर करण्याचा किंवा तिथे ‘लव्ह जिहाद’चा प्रयत्न झाला, तर आमचे तरुण त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. तरुणांनी आई-वडिलांची सेवा करावी, आपल्या बहिणींचे रक्षण करावे आणि जगदंबेचा आशीर्वाद घेऊन ‘राक्षसांचा’ संहार करण्यासाठी तयार राहावे.”
काँग्रेस आणि MIM ची तीव्र प्रतिक्रिया
रामेश्वर शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
- “आपली जीभ आवरा” – काँग्रेसची टीका:
भोपाळ मध्य मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी शर्मा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. “रामेश्वर शर्मा यांचे विधान अत्यंत नीच आणि हलक्या दर्जाचे आहे. त्यांनी आपली भाषा सुधारावी आणि असभ्यपणे बोलणे बंद करावे. मुस्लिम गरब्याला जात नाहीत, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. अशी चिथावणीखोर वक्तव्ये त्यांनी थांबवावीत, अन्यथा जनता त्यांना योग्य धडा शिकवेल,” असा इशारा मसूद यांनी दिला. - “भाजपच्या मुस्लिम नेत्यांनी उत्तर द्यावे” – MIM चे आव्हान:
AIMIM चे मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष मोहसीन अली खान यांनी आमदारांना संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. “अशी विधाने देशात फूट पाडण्याचे काम करतात. रामेश्वर शर्मा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांच्याशी चर्चा करावी,” असे खान म्हणाले. पुढे आव्हान देत त्यांनी विचारले, “जर शर्मा मुस्लिमांना त्यांच्या बहिणी-मुलींना गरब्यात आणण्यास सांगत असतील, तर भाजपचे मुस्लिम नेते अन्वर पटेल, जमाल सिद्दीकी आणि सय्यद जफर इस्लाम हे त्यांच्या बहिणी-मुलींना गरब्याला घेऊन जाणार का?”
गरबा आणि ओळखपत्रांची पडताळणी
गेल्या काही वर्षांपासून उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि काही राजकीय नेत्यांकडून गरबा उत्सवात मुस्लिमांच्या प्रवेशाला सतत विरोध केला जात आहे. गरबा स्थळी हिंदू तरुणींना लक्ष्य केले जाते, असा दावा कोणतीही ठोस माहिती न देता या संघटनांकडून वारंवार केला जातो. यामुळेच अनेक ठिकाणी गरबा आयोजक आणि विविध संघटना प्रवेशद्वारावर आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्याची मागणी करत आहेत.
