पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सौमेन रॉय यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. महत्वाचं म्हणजे रॉय हे तृणमुल काँग्रेसमधूनच भाजपामध्ये गेले होते. आता पुन्हा ते तृणमुल काँग्रेसमध्ये परतले आहेत. बंगालमध्ये ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार असून ३ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. समसेरगंज, भवानीपूर आणि जंगीपूर या तीन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

सौमेन रॉय हे कालियागंज मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. “भाजप आमदार सौमेन रॉय बंगाल आणि उत्तर बंगालच्या विकासासाठी पुन्हा तृणमुल काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. त्यांना बंगालची संस्कृती आणि वारसा अबाधित ठेवायचा आहे,” असं टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी म्हणाले. सौमेन रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे विधानसभेत भाजप आमदारांची संख्या ७१ वर आली आहे. गेल्या चार आठवड्यांत भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये गेले आहेत.

दरम्यान, पोटनिवडणुकीच्या घोषणेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमधून ममता बॅनर्जी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.