Karnataka BJP Cross Voting : विविध राज्यांमध्ये विरोधी खासदार-आमदार फुटले, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असेच नेहमी ऐकायला मिळते. केंद्रातील १२ वर्षांची सत्ता, २० पेक्षा अधिक राज्यांमध्ये सत्ता किंवा सत्तेत भागीदारी, तमिळनाडू वगळता अन्य विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांची सत्ता ताब्यात घेण्याची यशस्वी ठरलेली रणनीती या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार फुटले हे काहीसे नवलच. सध्याच्या राजकोय वातावरणात भाजपचेही आमदार फुटू शकतात हे काहीसे चकितच करणारे. पण कर्नाटकात तसे घडले.

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या आमदारांची मते फुटली हे पक्षानेच मान्य केले. कर्नाटक विधानसभेत भाजपचे ६४ आमदार आहेत. पण विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५६ मते मिळाली. काही आमदार आधीच पक्षापासून वेगळे झाले आहेत. तरीही चार ते पाच मते फुटली, असे कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आमदार बी. वाय. विजयेन्द्र यांनी मान्य केले. या फुटीची भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांना दखल घ्यावी लागली. यातूनच कर्नाटक अध्यक्ष, विरोधी पक्षनेते यासह सर्व वरिष्ठ नेत्यांना मंगळवारी नवी दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. देशभर भाजपची घोडदौड सुरू असताना कर्नाटकात पक्षाचे आमदार फुटले हे पक्षाच्या नेत्यांसाठी धक्कादायक ठरले आहे.

नक्की काय झाले?

कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी अलीकडेच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे पाच तर भाजपचे दोन उमेदवार निवडून आले. भाजप व धर्मनिरपेक्ष जनता दल युतीने तीन जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना केली होती. अन्य राज्यांमध्ये भाजपचे फोडाफोडीचे राजकारण यशस्वी होते. कर्नाटकात नुकताच सत्ताबदल झाला. सिद्दरामय्या यांच्या जागी डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. यामुळे काँग्रेसमधील असंतोषाचा फायदा उठविता येईल, असे भाजपचे धोरण होते. पण झाले उलटेच. नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांनीच भाजपला मोठा धक्का दिला. भाजपची मते फुटली. देवगौडा यांच्या जनता दलाचे १८ आमदार असताना या पक्षाच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची १४ मतेच मिळाली. दुसरीकडे, भाजपने आपल्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ठरवून दिला होता. पण दोन्ही उमेदवारांना तेवढी मते मिळाली नाहीत. भाजपच्या नेत्यांनी आधी तीन मते फुटल्याची शक्यता वर्तविली होती. पण सविस्तर चौकशीनंतर चार ते पाच मते फुटल्याचे निष्पन्न झाले. हा भाजपसाठी मोठा झटका मानला जातो.

आधीच दक्षिण भारतात भाजपची पाटी कोरी आहे. जी काही अपेक्षा आहे ती कर्नाटकात आहे. पक्षांतर्गत वादातून २०२३च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. येडियुरप्पा यांनी ७५ वर्षे पूर्ण केली म्हणून त्यांना पदावरून दूर करण्यात आले. त्याऐवजी बसवराज बोम्मई या जनता दलातून आलेल्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. पण बोम्मई फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेन्द्र यांच्याकडे आहे. पण राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा येडियुरप्पा पुत्राला विरोध आहे. यातूनच कर्नाटक भाजपमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. त्याचाच फटका विधान परिषद निवडणुकीत बसला. विजयेन्द्र यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी निवड करून आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याची येडियुरप्पा यांची योजना आहे.

सत्ता महत्त्वाची

कर्नाटकात भाजपची मते फुटली यावरून एक स्पष्ट की, सत्ता महत्त्वाची असते. सत्तेतील पक्ष कोणालाही कसेही वाकवू शकतो. कर्नाटकात सत्तेत असलेल्या काँग्रेसने हे दाखवून दिले. चार-पाच आमदार फुटले ते काही साधे-सोपे नसणार. सत्ताधारी पक्षाकडून पैसे, कामांचे आश्वासन किंवा अन्य काही बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्याशिवाय आमदारांची मते फुटणे शक्यच नाही. भाजपने केंद्रातील सत्ता हाती आल्यावर राज्याराज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना गळाला लावले. त्यासाठी ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाचा पुरेपूर वापर करून घेतला. कर्नाटकात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शिवकुमार यांच्या भोवती ईडीचा फास आवळण्यात आला होता. त्यांनी भाजप प्रवेशाचा प्रस्ताव नाकारल्यावर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. महाराष्ट्रात तर काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यात भाजपने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा फार कौशल्याने उपयोग केला. नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक नेता ईडीच्या भीतीनेच भाजपला शरण गेला. अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी भाजपवासी झाले. अजित पवारांनाही ईडीची सारखी भीती होती. त्यांनीही काका शरद पवारांच्या विरोधात बंड पुकारले. कारण भाजपकडे सर्वशक्तिमान अशी सत्ता होती. या सत्तेचा वापर किंवा दुरुपयोग करून भाजपने विरोधी पक्षातील बड्या-बड्या नेत्यांना थंड केले.

कर्नाटकात काँग्रेसने सत्तेचाच वापर केला असणार हे निश्चित. शिस्तप्रिय पक्ष म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करणाऱ्या भाजपच्या आमदारांनी पक्षाला धक्का दिला. दोन, चार किंवा कितीही असो, पक्षाच्या विरोधात जाण्याचे धाडस मोदी-शहांच्या भाजपमध्ये केले हे अधिक गंभीर. शिवकुमार यांनी अशी काय जादू केली की भाजपमधील पक्षांतर्गत वादात येडियुरप्पा व त्यांच्या पुत्राला धडा शिकविण्याचा भाजपच्या असंतुष्ट गटाचा प्रयत्न होता हे समजणे कठीण. पण भाजप अध्यक्षांनी मतफुटीची तातडीने दखल घेतली यावरून कर्नाटक भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले.

भाजपची मते का व कशी फुटली याची पक्षाकडून चौकशी होईलच. पण भाजपमध्येही मते फुटू शकतात हे महत्त्वाचे. नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांचे सर्व आमदारांशी चांगले संबंध असू शकतात. त्यातूनही ही फाटाफूट झाली असावी. कर्नाटकात काँग्रेसचे १४० आमदार असताना या पक्षाच्या पाच उमेदवारांना १५१ मते मिळाल्याने भाजप व जनता दलाची एकूण ११ मते फुटल्याचे स्पष्ट झाले.

मते फोडण्यासाठी प्रचंड पैसे वाटण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला. म्हणजेच भाजप आमदारांनी पैसे घेऊन विरोधात मतदान केल्याची एक प्रकारे पुष्टीच बोम्मई यांनी दिली आहे. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केल्याचेही बोम्मई यांचे म्हणणे आहे. भाजपनेही विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना थंड केले तेव्हा कसला वापर झाला होता, हे बोम्मईंना स्पष्ट करावे लागेल.

आमदार फुटले हे भाजपला फारच लागलेले दिसते. आता सर्व आमदारांना एका मठात नेऊन त्यांच्याकडून शपथ घेतली जाणार आहे. जे व्हायचे ते होऊन गेले. आपले आमदार भाजप नेत्यांना सांभाळता आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. भाजपने याचा विचार करणे आवश्यक आहे.