“राज ठाकरेंनी शरद पवारांकडून…”, ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा खुलासा!

बृजभूषण सिंह म्हणतात, “आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या…!”

Brij Bhushan Singh on MNS Raj Thackeray
बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला!

Brij Bhushan Singh on MNS Raj Thackeray : राज ठाकरेंचा स्थगित झालेला अयोध्या दौरा आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिलेला इशारा यावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा अद्याप थंड होण्याचं नाव घेत नाहीये. आज सकाळी मनसेकडून बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोरप सुरू झाले आहेत. बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रसद पुरवली गेल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना आता खुद्द बृजभूषण सिंह यांनी त्यावर खुलासा केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकला हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

“शरद पवार माझं कौतुक करत होते”

यावरून राजकारण पेटलेलं असताना बृजभूषण यांनी “होय, माझे शरद पवारांशी संबंध आहेत”, असं म्हटलं आहे. “शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे. माझे संबंध आहेत त्यांच्याशी”, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.

राज ठाकरेंना दिला खोचक सल्ला!

“आजही शरद पवार आम्हाला भेटले, तर मी त्यांच्याशी नजर चुकवणार नाही. मी त्यांना नमस्कार करेन. ते माझ्यासाठी एक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवं”, असा खोचक सल्ला बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

राज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट? बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”

“पक्षाचं काम करतोय”

दरम्यान, आत्तापर्यंत जाहीर पत्रकार परिषदेमधून राज ठाकरेंना विरोध करणं ही माझी वैयक्तिक भूमिका असल्याचं ठामपणे म्हणणारे बृजभूषण सिंह यांनी आता आपण पक्षाचं काम करत असल्याची भूमिका मांडली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सांगितलं आहे. पक्षाच्या सांगण्यावरून राज ठाकरेंना विरोध करत आहात का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता “मी पक्षाचं काम करत आहे”, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mp brij bhushan singh clerifies on photo with sharad pawar targets raj thackeray pmw

Next Story
राज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट? बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”
फोटो गॅलरी