मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आधीच दिला आहे. त्यातच आता त्यांनी नंदिनी येथे साधुसंत आणि नागरिकांसोबत बैठकीचं आयोजन केलं असून यावेळी काय निर्णय घेतला जातो याची उत्सुकता आहे. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना त्यांना पुन्हा एकदा राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात अचानक आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करू लागलेले राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे. त्यातच मंगळवारी बृजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशात मोठ्या रॅलीचं आयोजन केलं आहे.

“हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही,” अयोध्या दौऱ्यावरुन शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले “माझा नातूही काल…”

“उत्तर भारतीयांना विरोध करणारे कधीच येथे घुसू शकत नाही. मला मंत्री, नेता व्हायचं नाही आहे. मला द्यायचं तेवढं देवाने, पक्षाने आणि जनतेने दिलं आहे. जर उत्तर भारतीयांवर पुन्हा हात उचलला तर आम्ही शांत बसणार नाही, महाराष्ट्रात पोहोचू. ते दिवस आता संपले आहेत जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण केल्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांना संरक्षण देत होतं. आता त्यांना सुरक्षा मिळणार नाही. कोणतीही व्यक्ती धर्मविरोधी, देश तोडणारं वक्तव्य करत असेल तर पोलिसांनी त्यांची सुरक्षा हटवली पाहिजे,” असं बृजभूषण शरण सिंह म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; उत्तर भारतीयांची माफी मागण्याची भाजप खासदाराची मागणी

पुढे ते म्हणाले की, “राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही, माफी मागितली नाही तर मी वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत”. मला मराठ्यांचं समर्थन आहे असा दावाही यावेळी त्यांनी केला. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो असंही म्हणाले. राज ठाकरेंचा विरोध आहे, मराठ्यांचा नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

“राज ठाकरे यांनी सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा,” अशी बृजभूषण सिंह यांची मागणी आहे.

युतीत खोडा?

महाराष्ट्रात भाजपाने मशिदीचे भोंगे व हनुमान चालीसाच्या मुद्दय़ावरून राज ठाकरे यांना राजकीय पाठिंबा दिला असला तरी, त्याचे तीव्र पडसाद उत्तर भारतात उमटू लागले आहेत. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना पक्षाची शिस्त मोडून जाहीर विरोध केला आहे. बृजभूषण सिंह यांच्या विरोधाचा राज्यामधील भाजपच्या संभाव्य मनसे युतीवरही परिणाम होण्याची शक्यता मानली जात आहेत. भाजपने उघडपणे मनसेशी युती केली तर भाजपाला पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश व राजस्थान या दोन मोठय़ा राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये नुकसान होऊ शकते, असेही मानले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp brijbhushan sharan singh rally against mns raj thackeray ayodhya rally sgy
First published on: 10-05-2022 at 10:31 IST