मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला वारंवार विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह सध्या उत्तर प्रदेशात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचा अहंकार अजूनही कमी झालेला नाही अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

“भगवंताचे दर्शन घेण्यासाठी कोणालाही नतमस्तक व्हावे लागते. ते नतमस्तक झाले नाहीत. त्यांनी हिंदुत्ववादी नेते बनण्याचा प्रयत्न अहंकाराने केला नाही. ते स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवू शकले नाहीत आणि त्यामुळे अयोध्येला येऊ शकले नाहीत,” असे बृजभूषण सिंह म्हणाले.

“एक मराठी माणूस अयोध्येत…”; मनसेच्या अविनाश जाधव यांनी घेतले रामलल्लांचे दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं सांगताना हा आरोप केला होता. दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख जो पर्यंत माफी मागत नाही तो पर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असे वारंवार म्हणत आहेत. बृजभूषण सिंह राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्याची घोषणा केल्यापासून ते स्वाभिमान जन जागरण यात्रा काढत आहेत.

दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्या दौऱ्यानंतरही मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली.