Ethanol Blending In Petrol controversy : मध्य प्रदेशातील रीवा येथील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी केंद्राच्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोल धोरणाचं जोरदार समर्थन करत एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या वडिलांच्या घरातून येणार का?” असा थेट सवालच जनार्दन मिश्रा यांनी टीका करणाऱ्यांना विचारला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

देशात फक्त २० टक्के तेल तयार होतं

केंद्राच्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या मोहिमेचं समर्थन करताना मिश्रा यांनी युक्तिवाद केला की, भारत कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यापैकी केवळ २० टक्के तेल देशात तयार होतं, तर उर्वरित ८० टक्के तेल आयात करावं लागतं. सध्याची भौगोलिक-राजकीय परिस्थिती आणि कच्चे तेल वाहून आणण्यातील आव्हानांचा हवाला देत भाजपा नेत्याने सांगितलं की, भारताला पुरवठा करण्यासाठी तेल टँकरना कधीकधी १८०० किमीचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. मिश्रा म्हणाले, “अशा परिस्थितीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाबद्दल बोलतात, तेव्हा काही लोक आंदोलन सुरू करतात.”

शुद्ध पेट्रोल काय तुमच्या वडिलांच्या घरातून येणार का?

इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर टीका करत ते म्हणाले, “इथेनॉल चालणार नाही, शुद्ध पेट्रोलच चालेल, असा दावा करत एक आंदोलन सुरू आहे. शुद्ध पेट्रोल काय तुमच्या वडिलांच्या घरातून येणार का? देशात शुद्ध पेट्रोल नसेल तर ते कुठून येणार?” इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना होणाऱ्या विरोधावरही मिश्रा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारताला पर्यायी इंधनाचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं.

“जर इथेनॉल तयार झालं नाही, तर पेट्रोल कुठून येणार, डिझेल कुठून येणार?” असा सवाल त्यांनी केला. रीवाच्या खासदाराने ब्राझीलमधील इथेनॉलच्या मोठ्या प्रमाणातील वापराचा दाखला दिला आणि दावा केला की, तिथली वाहने पूर्णपणे याच इंधनावर चालतात. भारतीय वाहने देखील इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर चालण्यास सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला. मिश्रा म्हणाले, “ब्राझील जगात सर्वाधिक इथेनॉलचे उत्पादन करतो, म्हणूनच तिथली वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालतात.” भारतातील तज्ज्ञांना असं आढळून आलं आहे की इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनचे कोणतेही नुकसान होत नाही, असा दावा करत त्यांनी या धोरणाला होणारा विरोध अनावश्यक असल्याचा आरोप केला.

मिश्रा यांचं हे वक्तव्य सरकारचा इथेनॉल-ब्लेंडिंग कार्यक्रम आणि त्याचा वाहनांची कामगिरी, इंधनाची कार्यक्षमता व ग्राहकांवर होणारा परिणाम यावरील सततच्या चर्चेदरम्यान आलं आहे. केंद्राने स्पष्ट केलं आहे की, २० टक्के इथेनॉल असलेल्या E20 पेट्रोलच्या व्यापक चाचण्या आणि क्षेत्रीय अनुभवांवरून इंजिनची झीज, गंज लागणे किंवा वाहनाचे आयुष्य कमी होण्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. मिश्रा यांनी बायोगॅस आणि सीएनजीसह पर्यायी इंधनासाठी सरकारच्या व्यापक प्रयत्नांचे कौतुक केलं आणि हवाई संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने राबविलेल्या उपक्रमांवरही प्रकाश टाकला.