Rahul Gandhi lifetime election ban Substantive Motion: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ (Substantive Motion) सादर केला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींवर आरोप
खासदार दुबे यांनी संसदेच्या बाहेर पीटीआय या वृत्तवाहिनीबरोबर संवाद साधताना ही माहिती दिली. ‘देशाला धोका असणाऱ्या जॉर्ज सोरोस या शक्तींच्या मदतीने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे’, अशी माहिती दुबे यांनी दिली. जॉर्ज सोरोस हे हंगेरियन-अमेरिकन अब्जाधीश गुंतवणूकदार आहेत. जॉर्ज यांनी जगभरात उदारमतवादी विचारांना पाठिंबा दिल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या संघटना करतात.
हक्कभंग ऐवजी स्वतंत्र प्रस्ताव
राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करारात देश विकला, असा आरोप केला होता. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपाने त्यांच्याविरोधात मांडलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. सभागृहात निराधार विधाने करून लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ (Breach of Privilege) दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’ (Substantive Motion) मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.
भारत अमेरिका करारावरुन वादंग
आम्ही एखाद्या देशाकडून तेल खरेदी करु शकत नाही, असे अमेरिका सांगते त्यावेळी भारताची उर्जा सुरक्षा बाह्यशक्तीच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होतो. देशाहिताबरोबर तडजोड करताना सरकारला लाज वाटायला हवी. अमेरिकेने भारतावरील २५ टक्के टॅरिफ कमी केले, त्यावेळी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असे सांगितले. राहुल गांधी यांनी याचाच संदर्भ देऊन सभागृहात सरकारला धारेवर धरलं.
