India Partition History 3 June: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केली. दुबेंनी देशाच्या फाळणी आणि जम्मू व काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या समस्येला काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबच जबाबदार असल्याचा आरोप केला. फाळणीची पाळेमुळे लेडी माऊंटबॅटन यांच्या प्रेमात अंध होऊन नेहरूंनीच रोवली होती, असा घणाघात दुबेंनी केला. गद्दारी आणि देशद्रोहाच्या किताबाचे खरे मानकरी नेहरू-गांधी कुटुंबच असल्याचे टीकास्त्र दुबेंनी सोडले.
निशिकांत दुबेंची काँग्रेसवर टीका
खासदार निशिकांत दुबेंनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काँग्रेसवर प्रखर टीका करणारी पोस्ट केली आहे. दुबेंनी आजच्याच दिवशी इतिहासात घडलेल्या घटनेचा संदर्भ देऊन फाळणीसाठी काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबाला जबाबदार धरले. ”३ जून १९४७ रोजी, म्हणजेच आजच्याच दिवशी, माऊंटबॅटन यांनी दिल्लीत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या निर्मितीची घोषणा केली होती. नेहरूंच्या विलासी जीवनशैलीच्या पायावर झालेली ही घोषणा जागतिक इतिहासातील अत्यंत लाजीरवाण्या घटनांपैकी एक आहे”, असे दुबेंनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिमला करारावरुन नेहरुंवर टीकास्त्र
दुबेंनी शिमला करारावर देखील जोरदार टीका केली. फाळणीची पाळेमुळे १०-१२ मे रोजी शिमला येथे लेडी माऊंटबॅटन यांच्याबरोबर नेहरूंनी प्रेमात अंध होऊन रोवली होती. शिमला येथील तो फोटो पाहून कोणालाही भारताच्या फाळणीचे मुख्य केंद्र काय होते, हे सहज समजू शकते, असे दुबेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ”३ जून १९४७ च्या याच घोषणेने काश्मीर समस्येचाही पाया घातला”, असा आरोप करत दुबेंनी, “माऊंटबॅटन यांनी नेहरू-जिना करारामध्ये काश्मीरला वेगळे ठेवले, ज्या समस्येचा सामना भारत आजतागायत करत आहे”, असे मत मांडले.
देशद्रोहाच्या किताबाचा खरा मानकरी नेहरू-गांधी कुटुंबच – दुबे
खासदार दुबे पुढे म्हणाले की, “महात्मा गांधींना एक प्रकारे नजरकैदेत ठेवून, त्यांच्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय ही फाळणी करण्यात आली. गांधींना हयात असतानाच बाजूला सारणाऱ्या काँग्रेसने ३ जून १९४७ रोजीच अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यासारखे कृत्य केले होते. त्यामुळे गद्दारी, धूर्तपणा आणि देशद्रोहाच्या किताबाचा खरा मानकरी नेहरू-गांधी कुटुंबच आहे”, अशी बोचरी टीका त्यांनी केली. गेल्या महिन्यात राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा गद्दार म्हणून उल्लेख करत आरएसएसवर देखील जोरदार टीका केली होती.
