scorecardresearch

Video : “मी मिसेस केजरीवाल यांना हात जोडून सांगतो, तुमच्याशिवाय या माणसाला…”, भाजपा खासदाराचा टोला!

“मला वाटत नाही की अरविंद केजरीवाल यांना समजावण्याची हिंमत त्यांच्या पक्षात कुणाकडे आहे. त्यामुळे…!”

Video : “मी मिसेस केजरीवाल यांना हात जोडून सांगतो, तुमच्याशिवाय या माणसाला…”, भाजपा खासदाराचा टोला!
भाजपा खासदाराचा अरविंद केजरीवाल यांना टोला!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दिल्लीतील निवडणुकांनंतर आपनं पंजाबमध्येही काँग्रेसला धूळ चारत सत्ता मिळवली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यांनंतरही भाजपाला इथे अपेक्षित यश मिळवता आलं नाही. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी सुरू असून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. त्यात आता भाजपाचे दिल्लीतील खासदार परवेश साहिब सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खोचक शब्दांत टीका करताना त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली आहे.

काय म्हणाले भाजपा खासदार?

परवेश साहिब सिंह यांनी गुरुवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्यावर एकेरी भाषेत टीकास्र सोडलं. “हा माणूस खुर्चीसाठी एवढा वेडा झाला आहे की हा काय खोटं बोलतो, याचं यालाच माहिती नाही. हा काय पाप करतोय, याचं यालाच माहिती नाही. देवानं याला तीन वेळा दिल्लीचा मुख्यमंत्री केलं. पण हा दिल्लीच्या लोकांना दारू पाजतोय, कोविड काळात त्यांना ऑक्सिजन देत नाही. रुग्णालयं देत नाही”, अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केलं.

“तुम्हीच या माणसाला वाचवू शकता”

दरम्यान, सिंह यांनी केजरीवाल यांच्या कुटुंबियांचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांत विनंती केली आहे. “मला वाटत नाही की अरविंद केजरीवाल यांना समजावण्याची हिंमत त्यांच्या पक्षात कुणाकडे आहे. त्यामुळे आज मी श्रीमती अरविंद केजरीवाल, त्यांचे आई-वडील आणि त्यांची दोन मुलं यांना हात जोडून प्रार्थना करतो की तुमच्याशिवाय या माणसाला कुणीही वाचवू शकत नाही. कुणीही या माणसाला योग्य मार्गावर आणू शकत नाही. कुणामध्येच ही हिंमत नाही”, असं सिंह म्हणाले.

केजरीवालांचा ‘तो’ फोटो केला शेअर!

गेल्या काही दिवसांपासून सिंह यांनी सातत्याने अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे. दोन दिवसांपूर्वी सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांचा विमानातला एअर होस्टेससोबतचा एक फोटो ट्वीट केला होता. या ट्वीटमध्ये त्यांनी “आम आदमी है जी हम तो. ऑटो में चलते है. जब पार्टी प्रचार के लिए जाता हूँ तो चार्टर प्लेन से नहीं, ट्रेन से जाता हूँ”, हे अरविंद केजरीवाल यांचंच वाक्य पोस्ट करत टोला लगावला होता.

दिल्ली आणि पंजाबनंतर आम आदमी पक्षानं गुजरातवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे या दोन्ही पक्षांमधील राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगताना पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या