भाजपा खासदार प्रज्ञा ठाकुर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. कित्येक वेळेला पक्षाला त्यांच्या वक्तव्यापासून फारकत घ्यावी लागते. आता प्रज्ञा ठाकुर यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकुर या बास्केटबॉल कोर्टात खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका लग्नात डान्स करताना दिसत आहेत. यानंतर काँग्रेसने प्रज्ञा ठाकुर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आरोग्याचं कारण पुढे करत प्रज्ञा ठाकुर यांनी मालेगाव स्फोट प्रकरणात कोर्टात न येण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेश काँग्रेस प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी प्रज्ञा ठाकुर यांच्यावर टीका केली आहे.

नव्या व्हिडिओत प्रज्ञा ठाकुर या डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका लग्नातील आहे. प्रज्ञा ठाकुर यांच्या निवासस्थानी या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन गरीब मुलींच्या लग्न त्यांनी लावून दिलं. या कार्यक्रमात प्रज्ञा ठाकुर यांनी ठेका धरला होता. त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांनाही नाचायला बोलवताना त्या या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी शेअर केला आहे.

“आमच्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा ठाकुर यांना जेव्हा कुणाचीही मदत न घेता बास्केटबॉल खेळताना पाहतो तेव्हा आनंद होतो. आतापर्यंत हे कळू शकलं नाही त्यांना नेमकं काय झालं आहे?. मात्र त्यांना आता नाचताना पाहिलं आणि आनंद झाला. ईश्वर त्यांना चांगलं आरोग्य देवो”, असा टोमणा काँग्रेस नेते सलूजा यांनी मारला.

२००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकुर आरोपी आहेत. सध्या त्यांना जामीनावर सोडण्यात आलं आहे. जवळपास ९ वर्षे त्या तुरुंगात होत्या. उत्तर महाराष्ट्रातील मालेगावातील एका मशिदीजवळ स्फोट झाला होता, त्यात ६ लोकांचा मृत्यू, तर १००हून अधिक जण जखमी झाले होते.