Ravi Kishan Rahul Gandhi Prime Minister Remark: भाजपाचे खासदार आणि बॉलिवूडचे अभिनेते रवी किशन हे त्यांच्या अजब विधानांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. ‘जल्दी द लेट’, ‘होम फ्रॉम वर्क’, ‘नाम या पैसा’, ही त्यांची विधाने चांगलीच गाजली, यावरून इंटरनेटवर अनेक मीम्स तयार करण्यात आले. आता पुन्हा एकदा रवी किशन यांनी राहुल गांधीबाबत केलेले विधान व्हायरल होत आहे. भाजपाचे नेते राहुल गांधी यांना एकाबाजूला पप्पू किंवा इतर विशेषणांनी हिणवण्याचे काम करत असताना रवी किशन यांनी राहुल गांधींना थेट पंतप्रधान करून टाकले आहे. एएनआयशी बोलताना ते नेमके काय म्हटले? हे पाहू.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) रद्द करण्याच्या मागणीसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत आहेत. रोज नवनवीन क्लुप्त्या काढून ते यंत्रणेला जेरीस आणत आहेत. नुकताच त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याला कोपराने धक्का दिल्याचा व्हिडीओ समोर आला.

यावरून रवी किशन यांनी राहुल गांधींना सुनावताना त्यांना थेट पंतप्रधान म्हणून संबोधले.

रवी किशन म्हणाले, “हे दुर्दैवी आहे की, राहुल गांधी स्वतःच्या कार्यकर्त्यांना कोपरा मारत आहेत. तुम्ही पंतप्रधान होणार आहात आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मारता, याचा अर्थ तुम्ही देशाला किती कोपरे माराल.” यानंतर पुढे जाऊन रवी किशन राहुल गांधी यांना ‘कोपरे मारणारे पंतप्रधान’ म्हणून स्वप्न पाहा, असाही टोला लगावतात.

“तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कधी पंतप्रधान झालात, तर देशाला किती कोपरे माराल? २०४७ नंतर जर महादेव यांची कृपा असली तर तुम्ही कदाचित पंतप्रधान बनाल, पण तुमचे कोपरे मारण्याची वृत्ती पाहून देश घाबरला आहे. मी तर असा नेता पहिल्यांदाच पाहिला, जो आपल्याच कार्यकर्त्यांना मारत मारत पुढे जातो आणि हे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत. हद्दच झाली”, असेही रवी किशन पुढे म्हणाले.

काँग्रेसवर टीका

एसआयआर आणि ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील आंदोलनाबाबत बोलताना रवी किशन म्हणाले, काँग्रेस संपत चालली आहे. तुम्ही केरळ, तेलंगणामध्ये जिंकलात. पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. तिथे तुम्ही कुणाचाही राजीनामा मागत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे आहेत. राहुल गांधी यांच्या आंदोलनामुळे देशातील जनता वैतागली आहे.