सध्या सोशल मीडियावर एका भाजपा खासदाराचा भ्रष्टाचारावर (Corruption) बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओत हे भाजपा खासदार १५ लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार नसल्याचं बोलताना दिसत आहेत. हे बोलताना ते सरपंचाच्या निवडणुकीतच एकावेळी ७ लाख खर्च येत असल्याचंही सांगतात. तसेच मागील खर्च, पुढील निवडणुकीच्या तयारीचा १४ लाख खर्च आणि महागाई धरून १ लाख असे एकूण १५ लाख भ्रष्टाचार चुकीचा नाही, असं त्यांनी सांगितलं. या भाजपा खासदारांचं नाव जनार्दन मिश्रा असं आहेत. ते मध्य प्रदेशमधील रिवा मतदारसंघाचे खासदार आहेत.

खासदार जनार्दन रिवा म्हणाले, “सरपंच व्हायला ७ लाख रुपये लागतात. त्यामुळे जेव्हा लोक सरपंच भ्रष्टाचार करतो अशी तक्रार घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना गमतीने १५ लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल तर मला सांगू नका असं सांगतो. त्याने १५ लाखांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार केला असेल तर मला सांगा.”

व्हिडीओ पाहा

“कारण ७ लाख रुपये त्याने या निवडणुकीत खर्च केले, त्याने ७ लाख रुपये खर्च करून तो सरपंच झालाय. याशिवाय आणखी ७ लाख रुपये त्याला पुढील निवडणुकीसाठी हवे आहेत. महागाई वाढेल तर आणखी १ लाख त्यात गृहित धरावे लागतील. असे हे १५ लाख रुपये होतात. १५ लाख रुपयांपेक्षा पुढे तो घोटाळा करत असेल तर त्याचा भ्रष्टाचार समजू शकतो,” असं जनार्दन मिश्रा यांनी सांगितलं.

“ही परिस्थिती आहे. हे समाजाचं नग्न चित्र आहे. याच क्रमाने वरच्या स्तरावर ही शिडी चढत जाते,” असंही खासदार मिश्रा यांनी नमूद केलं. ते रिवा या आपल्या मतदारसंघातील एका कार्यक्रमा आलेले असताना बोलत होते. विशेष म्हणजे मिश्रा यांच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. हेच भाजपाचं स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त शासन का असंही लोक विचारत आहेत.

“‘पीएम आवास’ योजनेतील घरं मोदींच्या दाढीतून निघतात”

जनार्दन मिश्रा यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याचं हे पहिलंच उदाहरण नाही. याआधी त्यांनी मोदींच्या दाढीतून पीएम घरकूल योजनेतील घरं येतात असं विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “पीएम आवासमधील घरं पंतप्रधान मोदींच्या दाढीतून निघतात. मोदींच्या दाढीत घरंच घरं आहेत. एकदा दाढी हलवली की ५० लाख, दुसऱ्यांदा १ कोटी घरं येतात. जितक्या वेळी दाढी हलवतील तेवढी घरंच घरं मिळतील.”

हेही वाचा : दोषींची गय नाही, पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि … : अजित पवार

“तुम्ही सर्वजण मोदींच्या दाढीकडे पाहत राहा. ज्या दिवशी तुम्ही पाहायचं बंद कराल तेव्हा घरकूल मिळणं बंद होईल. मोदींची दाढी अमर आहे आणि तुम्हाला घरं मिळणं देखील अमर आहे. त्यामुळे मोदींची दाढी पाहात राहा आणि घरं मिळवत राहा,” असंही मिश्रा म्हणाले होते.