भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी हे कायम त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. बांगलादेशमधील परिस्थितीवरून प्रश्न उपस्थित करत त्यांनी आपल्याच सरकारला कडवट सवाल केला आहे. “आपण आता मालदीवला देखील घाबरणार का?” असं देखील सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. दुर्गापूजेदरम्यान बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यावरून बांगलादेशसोबतच भारतातील वातावरण देखील तापलं आहे.

भाजपा सरकार निषेध का करत नाही?

सुब्रमण्यम स्वामींनी आज दुपारी केलेल्या ट्वीटमधून केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. “बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा भाजपा सरकार निषेध का करत नाही? आपण बांगलादेशला घाबरतो का? लडाखमधील चीनी अतिक्रमणाच्या भितीनंतर आपण तालिबाननं अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावर देखील माघार घेतली आणि त्यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली. आता पुढे आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का?” असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामींनी केलं आहे.

बांगलादेशमधील हिंसाचारासंदर्भात भारतानं आत्तापर्यंत सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. “या प्रकरणी भारतीय दूतावास बांगलादेश प्रशासनाच्या संपर्कात आहे”, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली आहे.

“बांगलादेशमध्ये काही धार्मिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाल्याचं वृत्त आमच्यापर्यंत आलं आहे. बांगलादेश सरकारने यावर तातडीने पावलं उचलत कार्यवाही केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षादल देखील तैनात करण्यात आलं आहे”, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.