काँग्रेसचे माजी खासदार आणि १९८४ मधील दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलीतील आरोपी सज्जन कुमार यांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. दंगलीच्या गुन्ह्यात ते तिहारमध्ये जन्मठेप भोगत होते. २०१८ साली दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं होतं. १९८४ मध्ये शीख विरोधी दंगलीत एका शीख कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा आरोप सज्जन कुमार यांच्यावर ठेवला गेला होता.
दरम्यान, सज्जन कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं भाजपाच्या ३ खासदारांनी सांत्वन केल्याप्रकरणी राजकीय वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील भाजपाच्या या ३ खासदारांच्या कृतीला पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या ३ खासदारांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
हे ३ खासदार कोण आहेत?
कमलजीत सहरावत, रामवीर सिंग बिधुरी आणि योगेंद्र चंदोलिया या तीन खासदारांनी नुकतीच सज्जन कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या ३ खासदारांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
भाजपावर टीकेची झोड
सज्जन कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी भाजपाच्या ३ खासदारांनी भेट दिल्याप्रकरणी अनेकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. १९८४ च्या शीख-विरोधी दंगलीतील पीडितांसाठी लढा देणारे प्रमुख वकील असलेले वकील एच.एस.फुल्का यांनी या तीन खासदारांच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
“सहानुभूती ही फक्त पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी असायला हवी. त्यातील अनेकांसाठी त्या दिवसांमधील भयावह आठवणी आजही जिवंत आहेत. त्यामुळे या तीन खासदारांवर बहिष्कार टाकण्याचं मी आवाहन करतो,” असं एच.एस.फुल्का यांनी म्हटलं आहे.
Strongly condemn visit of 3 MP’s Kamaljeet Sehrawat, Ramvir Singh Bidhuri and Yogender Chandolia to mass murderer Sajjan Kumar’s residence to offer condolences on his death. This when #BJP has always supported our quest for justice against this culprits and supported us in…
— H S Phoolka (@hsphoolka) August 28, 2026
भाजपाने काय स्पष्टीकरण दिलं?
भाजपाचे हे तीन खासदार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नाही, तर वैयक्तिक पातळीवर सज्जन कुमार यांच्या घरी गेले होते. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण भाजपाने दिलं आहे.
नितीन नबीन यांनी काय म्हटलं?
भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी रामवीर बिधुरी, योगेंद्र चंडोलिया आणि कमलजीत सहरावत या तीन खासदारांना बोलावलं होतं. तसेच त्यांनी तिथे जायला नको होते, अशी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
