दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस असून याठिकाणी थोड्याचवेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. निवडणूक आयोगाकडून नुकताच उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज भाजप कार्यकर्त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

तत्पूर्वी काल या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि निश्चलनीकरणाच्या अभूतपूर्व निर्णयांमुळे जगाचा भारताकडे आणि लोकांचा भाजपकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असा दावा यावेळी अमित शहा यांनी केला.  उरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश सरकारकडून कठोर पावले उचलण्याची अपेक्षा ठेवून होता. लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशाची आणि सैनिकांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असेल, असे आश्वासन आम्ही दिले होते. हे सरकार काँग्रेसचे नसून मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार आहे. या खंबीर नेतृत्त्व आणि इच्छाशक्तीमुळेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शत्रूला त्यांच्या घरात घुसून जशास तसे उत्तर देण्यात आले. या एका कृतीमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.