Cabinet Reshuffle: भारतीय जनता पक्षाने आज जम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत तीन माजी मुख्यमंत्री, १८ खासदार आणि १० महिलांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी नितीन नबीन यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतली. यानंतर विविध राज्यातील अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. अनेक महत्वांच्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश केला असताना एका नावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एवढेच नव्हे तर यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात देखील खांदेपालट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पियुष गोयल राष्ट्रीय खजिनदार
नव्या कार्यकारिणीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याचा कार्यभार सांभाळत आहेत. गोयल यांचा कार्यकारिणीत समावेश केल्याने येत्या मंत्रिमंडळ फेरबदलात गोयल यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. भाजपात एक नेता एक पद असा अलिखित नियम प्रचिलित आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता अमित शाह यांनी देखील वाच्यता केली आहे. त्यामुळे गोयल यांना मंत्रिपदावरुन हटवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोयल यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार?
पक्षाने राजकीय पक्ष, संघटना आणि सरकारमधील जबाबदारी अशी विभागनी देखील केल्याचे सांगितले जाते. पक्षात पद सांभाळून संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करणे अथवा सरकारमध्ये योगदान देणे असे याचे विभाजन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे गोयल यांचा कार्यकारिणीत समावेश केल्याने त्यांना मंत्रिपदावरुन हटवले जाऊ शकते असे संकेत मानले जात आहेत. दरम्यान, गोयल यांना मंत्रिमंडळातून हटवले जाईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अमेरिका आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापाराशी निगडीत सुरु असणाऱ्या करारावर चर्चा करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर आहे.
नड्डा अपवाद
विशेष म्हणजे पियुष गोयल यांचे वडील वेद प्रकाश गोयल हे देखील भाजपाचे तब्बल २० वर्षे खजिनदार होते. दरम्यान, एक नेता एक पद या तत्वाला भाजपाचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा अपवाद होते. जानेवारी २०२० मध्ये अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या नड्डांचा कार्यकाळ २०२४ लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढविण्यात आला होता. जून २०२४ मध्ये नड्डांकडे मोदींच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यानंतर जानेवारी २०२६ मध्ये नबीन पक्षाचे अध्यक्ष झाले.
