BJP National Executive Team: भारतीय जनता पक्षाने विविध राज्यांतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. नितीन नबीन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सात महिन्यांनी, सोमवारी भाजपाने राष्ट्रीय पदाधिकारींच्या नव्या टीमची घोषणा केली. बी. एल. संतोष हे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पदावर कायम आहेत, तर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आलीय. आठ राष्ट्रीय सरचिटणीसांपैकी केवळ विनोद तावडे आणि सुनील बन्सल या दोघांनाच कायम ठेवण्यात आले आहे. भाजपाने अमित मालवीय यांची सोशल मीडिया संयोजकपदावरून उचलबांगडी करत त्यांच्या जागी दीपक म्हस्के यांची नियुक्ती केली आहे.

मीडिया संयोजक, सह-संयोजकपदी कोण?

दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय आशिष अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव यांची माध्यम सह-संयोजकपदी, तर प्रीती गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव यांची सोशल मीडिया सह-संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बलोनी हे पक्षाचे माध्यम प्रभारी म्हणून काम पाहतील, तर नवनिर्वाचित राज्यसभा खासदार तरुण चुघ यांची कार्यालयीन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत दीपक म्हस्के?

म्हस्के हे सध्या छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. म्हस्के यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून, पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलमध्ये त्यांना सुमारे १५ वर्षांचा अनुभव आहे. म्हस्केंनी बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडिया मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. म्हस्के यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. म्हस्केंची बंधू तेज प्रताप म्हस्के हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत.

कार्यकारिणीत कोणाला कोणती संधी?

नव्या कार्यकारिणीत दिंडोरीच्या खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देव, राज्यसभा खासदार संजय भाटिया व सतीश पुनिया, माजी खासदार व आसामचे प्रभारी हरिश द्विवेदी आणि खरगोनचे खासदार गजेंद्र पटेल हे नवे सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत राम माधव यांची राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, माजी खासदार तीरथसिंह रावत, रेखा वर्मा आणि उत्तर प्रदेशचे विधानपरिषद सदस्य तारिक मन्सूर यांच्याबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १३ उपाध्यक्षांपैकी सहा महिला आहेत.