नवी दिल्ली : भाजपने गुरुवारी संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्रिपुरा या राज्यांसाठी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक बदलांना सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणामध्ये अर्चना गुप्ता यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात आली असून, पंजाबमध्ये केवल सिंह ढिल्लों यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर, त्रिपुरात अभिषेक देबरॉय यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या नियुक्त्या केल्या असून पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबत घोषणा केली. या सर्व नियुक्त्या तात्काळ लागू करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

हर्ष मल्होत्रा हे सध्या केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असून ते पूर्व दिल्लीचे खासदार आहेत. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. केवल सिंह ढिल्लों हे पंजाबमधील अनुभवी नेते असून ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. २०२२ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अर्चना गुप्ता या हरियाणा भाजपच्या सरचिटणीस म्हणून काम पाहत होत्या. तर अभिषेक देबरॉय यांनी २०२३ च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत माताबारी मतदारसंघातून विजय मिळवला होता. भाजपने राज्य पातळीवरील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हे फेरबदल केल्याचे मानले जात आहे.

केंद्र सरकारमध्येही फेरबदल?

राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितीन नवीन यांनी पहिल्यांदाच एकाचवेळी चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमुळे भाजपच्या राष्ट्रीय संघटनात्मक बदलांचेही वारे वाहू लागल्याचे संकेत मिळाले आहेत. नवीन यांनी पक्षाध्यक्षपद झाले असले तरी त्यांना स्वत:चा चमू अजून तयार करता आलेला नाही. अत्यंत प्रतिष्ठेची पश्चिम बंगालची निवडणूक झाली असल्यामुळे नवीन यांच्या नव्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांचीही निवड लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपाध्यक्ष व राष्ट्रीय महासचिवांची नियुक्ती केल्यानंतर केंद्र सरकारमध्येही फेरबदल केले जाऊ शकतात असे मानले जात आहे.