नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकार्यांची घोषणा केली. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर विजनवासात गेलेल्या आक्रमक नेत्या स्मृती इराणी तसेच, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीचा फटका बसलेले संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य राम माधव या दोघांचेही पुनरागमन झाले आहे.
या नेत्यांना अनुक्रमे राष्ट्रीय महासचिव व उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष नवीन यांनी नव्या चमूमध्ये युवा, महिलांच्या समावेशावर अधिक भर दिला असून काही अनुभवी चेहरेही कायम ठेवण्यात आले आहेत. भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेत १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, आठ राष्ट्रीय सरचिटणीस आणि १६ राष्ट्रीय सचिव यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार असतील. तरुण चुघ हे राष्ट्रीय कार्यालयाचे प्रभारी असतील. डॉ. संबित पात्रा हे ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक असतील.
तावडे-बन्सल कायम
नव्या चमूमध्ये अनेक जुन्या पदाधिकार्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला असला तरी विनोद तावडे व सुनील बन्सल यांच्यावरील भाजप नेतृत्वाचा विश्वास कायम असून त्यांना राष्ट्रीय महासचिवपदी कायम ठेवण्यात आले आहे. तावडे यांनी बिहार व केरळ तर बन्सल यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रमुख जबाबदारी पार पाडली होती. दोघांनाही आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्येही महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. जुन्या चमूतील दुष्यंत गौतम, राधामोहन दास अग्रवाल, संजय मयुख, सरोज पांडे, तेजस्वी सूर्या, लक्ष्मीकांत बाजपेयी आणि अरुण सिंह यांना डच्चू देण्यात आला आहे. गेल्या कार्यकारिणीत सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांना यावेळी वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून ५ जण
राज्यातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह विनोद तावडे, भारती पवार, शिवप्रकाश आणि प्रीती गांधी अशा पाच जणांना राष्ट्रीय स्तरावरील संघटनेमध्ये स्थान मिळाले आहे.
संघातील नेत्यांवर विश्वास
संघातून भाजपमध्ये आलेल्या महत्त्वाच्या नेत्यांवर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. राष्ट्रीय महासचिव (संघटना) म्हणून बी. एल. संतोष तसेच, त्यांचे सहकारी शिवप्रकाशही सहमहासचिव- संघटनपदी कायम राहिले आहेत. सौदान सिंह हे दुसरे सहमहासचिव (संघटन) असतील.
अमित मालवीय यांची उचलबांगडी
नव्या राष्ट्रीय संघटनात्मक चमूमध्ये पक्षाच्या डिजिटल आणि सोशल मीडिया विभागात मोठा बदल केला असून ११ वर्षांपासून भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया विभागाची धुरा सांभाळणारे अमित मालवीय यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी छत्तीसगडचे नेते दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शहजाद पूनावाला यांचा राजीनामा
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोमवारी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पूनावाला यांनी आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थिती हे राजीनाम्याचे प्रमुख कारण असल्याचे पक्षाध्यक्ष नवीन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
