नवी दिल्ली : भाजपने सोमवारी जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय संघटनात्मक चमूमध्ये पक्षाच्या डिजिटल आणि सोशल मीडिया विभागात मोठा बदल केला असून ११ वर्षांपासून भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया विभागाची धुरा सांभाळणारे अमित मालवीय यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी छत्तीसगडचे नेते दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मालवीय यांची २०१५मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यकाळात पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडिया विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर दशकभराहून अधिक काळ भाजपच्या डिजिटल प्रचारयंत्रणेची जबाबदारी त्यांनी सांभाळली. पश्चिम बंगालचे पक्षाचे सहप्रभारीपद मात्र मालवीय यांच्याकडे कायम राहिले आहे.
‘जेन झी’ आंदोलनानंतर नवी डिजिटल रणनीती?
जंतर-मंतरवर“जेन-झीं’नी केलेल्या आंदोलनानंतर तरुण मतदारांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर होते. बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे हे बदल अपेक्षित होते. भाजपसाठी सोशल मीडिया हे केवळ प्रचाराचे माध्यम न राहता पक्षाचा थेट मतदारांशी संवाद, विरोधकांच्या आरोपांना उत्तर, निवडणूक प्रचाराचे नियोजन तसेच, राजकीय कथानक घडवण्याचे प्रमुख साधन आहे. त्यामुळेच मालवीय यांच्या जागी म्हस्केंची नियुक्ती हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे.
छत्तीसगडच्या म्हस्के यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी
दीपक म्हस्के हे छत्तीसगड भाजपमधील संघटनात्मक आणि माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले नेते आहेत. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. नुकतीच त्यांची ‘छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. निवडणूकविषयक आकडेवारीचे विश्लेषण, डिजिटल नियोजन आणि राजकीय प्रचार या क्षेत्रांतही त्यांना मोठा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या प्रीती गांधी, दिल्लीचे शिवानंद द्विवेदी, उत्तराखंडचे आलोक भट्ट आणि हरियाणाचे अरुण यादव यांची राष्ट्रीय सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मीडिया विभागातही फेरबदल
अनिल बलूनी यांना राष्ट्रीय मीडिया समन्वयपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर, आशीष अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव यांची राष्ट्रीय मीडिया सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शहजाद पूनावाला यांचा भाजपला राजीनामा
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोमवारी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पूनावाला यांनी आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थिती हे राजीनाम्याचे प्रमुख कारण असल्याचे पक्षाध्यक्ष नवीन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आपण खासगी क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतल्या असला तरी, भाजपच्या विचारधारेपासून दूर जाणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या दृष्टिकोनाला आणि कार्याला यापुढेही शक्य त्या स्वरूपात पाठिंबा देत राहू, असे पुनावाला यांनी म्हटले आहे. ३० जुलैला त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र तो स्वीकारला गेला नव्हता. पण आपण निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दहा महिलांना स्थान
नवीन यांनी राष्ट्रीय चमूमध्ये दहा महिला नेत्यांना स्थान देण्यात आले असून त्यामध्ये ६ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ३ राष्ट्रीय सचिव तर १ राष्ट्रीय महासचिव आहे. उपाध्यक्षपदी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना कायम ठेवले असून त्यांच्याबरोबर डी पुरंदेश्वरी-आंध्र प्रदेश, रेखा वर्मा-उत्तर प्रदेश, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी-गुजरात, भारती प्रवीण पवार-महाराष्ट्र, डॉ. मधूचंद्र कर- पश्चिम बंगाल यांना संधी दिली आहे. राष्ट्रीय सचिव म्हणून फांगनॉन कोन्याक- नागालँड, संगीता यादव-उत्तर प्रदेश, कविता पाटीदार – मध्य प्रदेश आणि राष्ट्रीय महासचिवपदी स्मृती इराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांना स्थान
नव्या राष्ट्रीय महासचिवांमध्ये त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, राजस्थानचे सतीश पूनिया, मध्य प्रदेशातील गजेंद्र पटेल, उत्तर प्रदेशातील हरीश द्विवेदी आणि हरियाणातील संजय भाटिया यांचा समावेश आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंह बादल, तीरथ सिंह रावत यांना स्थान दिले आहे. या अनुभवी नेत्यांना संघटनेत पुन्हा महत्त्वाची भूमिका देताना विविध राज्ये आणि सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. पांडा व वर्मा हे उपाध्यक्षपदी कायम राहिले आहेत.
नव्या भाजपवासींचाही समावेश
‘आप’मधून बंडखोरी करून भाजपमध्ये आलेले राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आले आहे. त्यांनी एप्रिलमध्ये राघव चड्ढा यांच्याबरोबर ‘आप’ला सोडचिठ्ठी दिली होती. नव्या चमूत चड्ढा यांना स्थान मिळालेले नाही. त्यांच्याबरोबर केरळमधील काँग्रेसमधून आलेले अनिल अँटोनी यांचाही समावेश झाला आहे.
आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार
पक्षाध्यक्ष नवीन यांच्या नव्या चमूची घोषणा झाल्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. संघटनेप्रमाणे मंत्रिमंडळातही युवा-महिला मंत्र्यांना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात या महत्त्वाच्या राज्यांत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने जातींचे समीकरणही सांभाळले जाऊ शकेल. त्यामुळे अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
