गुजरातमध्ये सलग अडीच दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राज्यात सलग सातव्यांदा विजय साकारणाऱ्या भाजपाने गेल्या निवडणुकीत कडवी झुंज देणाऱ्या काँग्रेसला भुईसपाट केलं आणि पहिल्यांदाच संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला एक आकडी जागांवरच रोखलं. मात्र, गुजरातमध्ये अभूतपूर्व विजय मिळवणाऱ्या भाजपाने हिमाचलची सत्ता गमावली. या निकालावर भाजपा नेते नितीन गडकरी यांनी ‘आज तक’च्या कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमधील ऐतिहासिक विजयावर ते म्हणाले की “भाजपाशी जोडली गेलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलभूत तत्वं आहेत. राष्ट्रवाद हा आमच्या विचारांचा आत्मा आहे. चांगलं प्रशासन आणि विकास हे आमचं मिशन आहे. तसंच सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीयांचा विकास कऱणं हे आमचं लक्ष्य आहे”.

Gujarat elections : भाजपचे विक्रमी सत्तासप्तक; गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, हिमाचलची सत्ता काँग्रेसकडे

“सत्तेत असताना चांगलं प्रशासन आणि विकासाशी जोडलेलं राजकारण करणं याकडे आमचं लक्ष असतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाला एक वेगळी दिशा दिली. देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आम्ही हाच अजेंडा कायम ठेवला. चांगले रस्ते, पाणी, वाहतूक, शेती अशा अनेक भागात आम्ही रेकॉर्ड केले. विकासाची कामं जी लोकांना दिसली आणि गुजरातमधील जनतेने जे अनुभवलं, त्यामुळेच सलग २७ वर्षांपासून मोदींच्या नेतृत्वात विश्वास आणि समर्थन मिळत आहे,” असं कौतुक गडकरींनी केलं.

दरम्यान हिमाचलमधील पराभवाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मी जेव्हा भाजपाध्यक्ष होतो तेव्हाही दोन निवडणुका झाल्या होत्या. तिथे फार अटीतटीची लढत झाली आहे. सत्ताधारी पक्ष आण विरोधकांच्या मतांमधील अंतर फार कमी असतं. आम्ही फार कमी मतांनी पराभूत झालो आहोत. अनेकदा लोकांची सरकारविरोधातील नाराजी असते, परिवर्तनाची इच्छा असते. पण आमच्या आणि काँग्रेसच्या मतांमध्ये फार काही अंतर नाही. नशीबाने आम्हाला तिथे साथ दिली नाही”.

अजून एक, दोन टक्के जास्त मतं मिळाली असती तर आमचा विजय झाला असता अशी खंत गडकरींनी यावेळी बोलून दाखवली. दरम्यान गुजरातमधील विजयासाठी मोदींना श्रेय आणि हिमाचलमधील पराभवासाठी नशीबाला जबाबदार ठरण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “भाजपामध्ये मोदींपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण मेहनत घेऊन निवडणूक लढतात. पण शेवटी जनताच माय-बाप असते. त्यांचे स्थानिक तसंच इतर मुद्दे असतात,”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nitin gadkari on result of gujarat assembly and himachal pradesh assembly election result sgy
First published on: 10-12-2022 at 13:32 IST