भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताला आखाती देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं असून सौदी अरेबियानेही निषेध नोंदवला आहे. त्यातच आता तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तान सरकारनेही भारताला धर्मांधतेवरुन सुनावलं आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी भारताला मुस्लिमांच्या भावना भडकावू नयेत अशी विनंती केली आहे.

“आम्ही भारत सरकारला विनंती करतो की, अशा धर्मांधांना इस्लाम धर्माचा अपमान करु देऊ नका आणि मुस्लिमांच्या भावना भडकावू नका,” असं तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजैद म्हणाले आहेत.

भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नुपूर शर्मांवर कारवाई कशासाठी?; पक्षाचं नेमकं म्हणणं काय?

एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावरुन टीका होऊ लागल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या आठवडाभरानंतर ही कारवाई करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्यासोबत दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली.

भाजपविरोधकांना कोलीत ! ; नूपुर शर्माप्रकरणी ‘लज्जास्पद धर्माधते’चा काँग्रेसचा आरोप

तालिबानने निषेध करताना म्हटलं आहे की, “प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात भारताच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांचा आम्ही कडक शब्दांत निषेध करतो”.

आतापर्यंत १४ देशांनी भारताविरोधात निषेध व्यक्त केला आहे. यामध्ये इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, युएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बहारीन, मालदिव, लिबिया आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे.

Maharashtra Breaking News Live: प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणाचे पडसाद, राज्यसभा निवडणुकीची चुरस; क्षणोक्षणीचे अपडेट्स एकाच क्लिकवर

संयुक्त अरब अमिरातीमधील परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक पत्रक जारी करत, ज्या गोष्टी नैतिक मूल्यांच्या आणि सिद्धांतांच्या विरोधात आहेत त्याला आम्ही विरोध करतो, असं म्हटलं. संयुक्त अरब अमिरातीने जारी केलेल्या या पत्रकात सर्व धार्मिक प्रतीकांचा सन्मान केला गेला पाहिजे. द्वेषपूर्ण वक्तव्य पूर्णपणे हद्दपार केली पाहिजेत. एखाद्या धर्माच्या अनुयायांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य करता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.

‘लज्जास्पद धर्माधते’चा काँग्रेसचा आरोप

नूपुर यांचे निलंबन म्हणजे ‘’सौ चुहे खा कर बिल्ली हज को चली’’ असा प्रकार असून भाजपची ‘लज्जास्पद धर्माधता’ देशाला आतून पोखरत असल्याची आरोप काँग्रेसने सोमवारी केला.

“अंतर्गत फुटीमुळे देश बाहेरूनही (आंतरराष्ट्रीय स्तरावर) कमकुवत होत आहे. भाजपाच्या लाजीरवाण्या कट्टरतेमुळे जागतिक स्तरावर आपण एकटे पडलो, एवढेच नव्हे तर आपली प्रतिष्ठाही खालावली,” अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करायचे, लोकांमध्ये द्वेष पसरवायचा आणि सर्व धर्माचा आदर करत असल्याचा देखावाही करायचा, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. स्मशान, कब्रस्तान, ८० विरुद्ध २०, बुलडोझर, मस्ती जिरवणे..असे शब्द भाजपाने प्रचलित केले असून मतांच्या राजकारणासाठी नवा शब्दकोष तयार केला आहे, अशी टिप्पणी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली.

भाजपाला धर्माध राजकारणाचा पश्चाताप होत नसून तो सरडय़ासारखे रंग बदलत आहे. त्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे. पक्ष त्यांचा प्याद्यासारखा वापर करतो आणि गरज संपल्यानंतर त्यांना फेकून दिले जाते, अशी टीकाही करण्यात आली आहे.

काँग्रेसच नव्हे तर, भाजपशी जवळीक साधणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही भाजपवर टीका केली आहे. प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांविरोधात भाजपने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. निव्वळ निलंबित करणे वा हकालपट्टी करणे पुरेसे नाही, या व्यक्तींना तुरुंगात टाकले पाहिजे, असे मायावती म्हणाल्या. भाजपच्या धार्मिक कट्टरतेसाठी देशाने कशासाठी माफी मागायची, रात्रंदिवस लोकांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या भाजपने देशवासीयांची माफी मागितली पाहिजे, असा संताप राष्ट्रीय तेलंगण समितीचे नेता व मंत्री के. टी. रामाराव यांनी व्यक्त केला.