गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. त्याआधी आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या काही खासदारांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे) पक्षाचेही ६ खासदार फुटले. या सर्व घडामोडीनंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी (११ जुलै) भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. ‘नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना मंत्रि‍पदासह २० ते ३० कोटी रुपयांची ऑफर भारतीय जनता पक्षाने दिल्याचा मोठा दावा ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी काय म्हटलं?

जम्मू-काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील सरकार अस्थिर करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोपही ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

“माझ्या एका आमदाराने मला सांगितलं की भाजपाच्या एका नेत्याने, जे वकिलही आहेत. त्यांनी एका आमदाराशी संपर्क साधला होता. पक्षांतर करण्याच्या बदल्यात त्या आमदाराला २० ते ३० कोटी रुपये, मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यांनी २० ते ३० कोटी रुपये, मंत्रिपदाचं आमिष दाखवलं. मात्र, आमच्या आमदाराला विकत घेण्यात त्यांना अपयश आलं. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या प्रत्येक आमदाराला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली, तरीही भाजपाला यश मिळणार नाही”, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभेत ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत बहुमताचा आकडा ४६ इतका आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाकडे ४१ आमदार आहेत, तर काँग्रेसच्या सहा आमदारांचा पाठिंबा आहे. पाच अपक्ष आणि सीपीएमच्या एका आमदाराचाही ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे सध्या तरी ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचं बोललं जात आहे.