नवी दिल्ली : महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर देशातील राजकारण तापले असून, भाजपने शनिवारी रस्त्यावर उतरून विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीविरोधात आक्रमक आंदोलन सुरू केले. विरोधकांनी महिलांच्या हक्कांशी विश्वासघात केल्याचा आरोप करत भाजपच्या महिला नेत्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींच्या घरावर मोर्चा काढला.
महिलांना आरक्षण न मिळण्याला काँग्रेस व इतर विरोधी पक्ष जबाबदारी असून हे कथित वास्तव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी ‘रालोआ’च्या बैठकीत घेण्यात आला होता. भाजप महिला मोर्चा देशभर जिल्हा स्तरावर आंदोलन उभारणार असून, प्रत्येक ठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि सभा घेऊन विरोधकांचा कथित ‘महिला विरोधी चेहरा’ उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पश्चिम बंगाल व तामीळनाडूमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत शनिवारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार हेमा मालिनी आणि बांसुरी स्वराज यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत, कपाळावर काळी पट्टी बांधून ‘धोकेबाज’ आणि ‘नारीशक्तीचा अपमान’ अशा घोषणा दिल्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ताही सहभागी झाल्या होत्या. महिलांचा अपमान देश सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसवर जोरदार टीका
दिल्लीत दिवसभर ‘रालोआ’तील घटक पक्षांचे नेते, मंत्री, खासदार यांनी पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेसवर टीका केली. यामध्ये अशोक चव्हाण, रामदास आठवले यांचा समावेश होता. काँग्रेसने महिलांचा अपमान केल्याचा आरोप या नेत्यांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, विरोधकांच्या राजकारणामुळे महिलांच्या प्रतिनिधित्वाची मोठी संधी हिरावली गेली. तामिळनाडूसारख्या राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप केला. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर टीका केली. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळू नये म्हणून विरोधकांनी त्यांच्या राजकीय स्वप्नांचा चुराडा केला आणि संसदेत त्याचा आनंद साजरा केला, असा शाब्दिक हल्लाबोल केला.
