Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ आजाराच्या प्रादुर्भावामुळे राजस्थानमध्ये आत्तापर्यंत तब्बल ५७ हजार गायी दगावल्या आहेत, तर ११ लाख गायींना या रोगाची लागण झाली आहे. या विरोधात भाजपाकडून जयपूरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य विधानभवनावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. यावेळी आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडले आणि राजस्थान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

‘लम्पी’मुळे गुरे गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ;  ३० हजारांपर्यंत मदतीचा सरकारचा निर्णय

भाजपाने हा मुद्दा विधानभवनातदेखील उपस्थित केला आहे. या रोगाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एका भाजपा आमदाराने विधानभवन परिसरात गायीला आणत रोगाची भीषणता लक्षात आणुन दिली. दरम्यान, या रोगाला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

लम्पीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राण्यांचा बाजार, प्रदर्शनावर बंदी

“गायींचा जीव वाचवणे आमची प्राथमिकता आहे. केंद्र सरकारने त्यासाठी लस आणि औषधं पुरवावीत”, असे गेहलोत म्हणाले आहेत. लम्पी आजारामुळे जयपुरातील दूध संकलनाला फटका बसला आहे. यामुळे राज्यात उत्पादित मिठाईच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. दूध संकलनात १५ ते १८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे वितरणात अडचणी येत असल्याची माहिती ‘जयपूर डेअरी फेडरेशन’ने दिली आहे.


लम्पी या रोगाचा प्रसार देशातील १३ राज्यांमध्ये झाला आहे. या रोगाचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे. लम्पी रोगाचा सामना करण्यासाठी अतिरिक्त मदत आवश्यक असल्याचे अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या रोगाच्या लशीची निर्मिती झाल्यानंतर राजस्थानला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी गेहलोत यांनी केली आहे.