भाजप व रा.स्व.संघ विचारसरणीचा (वैचारिक) दहशतवाद पसरवितअसल्याचा आरोप करीत काँग्रेसने  भाजप या प्रमुख विरोधी पक्षाची तुलना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेशी करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. देशात जातीय दंगे घडवण्यात भाजप व रा.स्व संघाला आनंद मिळतो, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील मुस्लीम तरूणांच्या संपर्कात आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केल्याबाबत भाजपने केलेली टीका पोरकटपणाची आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.जिथे अशांतता आहे तिथे शत्रूपक्ष गळ टाकून पाहणार हे स्वाभाविक आहे. आपल्या देशात आपल्याच लोकांनी जातीय दंगे घडवून आणले तरी त्यांना तेच हवे आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले.
राहुल गांधी हे एक जबाबदार राजकीय नेते आहेत, ते खरे बोलतात, जातीय फूट पाडणाऱ्यांपासून लोकांना सावध करतात. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी युवकांना सावध केले. ते जे काही म्हणाले ते सर्व देशाला माहीत आहे. जेव्हा घर आतलेच लोक पेटवतात तेव्हा बाहेरच्या शत्रूंना त्याचा फायदा मिळतो, भारतविरोधी शक्ती त्याचा गैरफायदा घेतात असे सूरजेवाला म्हणाले. गुप्तचर अधिकाऱ्याने कोणत्या अखत्यारित सरकारचे भाग नसलेल्या राहुल गांधी यांना माहिती दिली, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी टाळले. ज्या शक्ती देशाला विभाजित करीत आहेत त्यांची विचारसरणी वेगळी आहे. भाजप व रा.स्व.संघ हे वैचारिक दहशतवाद करीत आहेत, त्यामुळे देशाच्या एकात्म धाग्याला धोका आहे, असा आरोप त्यांनी केला
जातीय संघर्षांत भाजप तेल ओतत आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी सांगितले. जेव्हा देशात जातीय दंगली होतात तेव्हा फक्त पाकिस्तानची आयएसआय व भारतातील विरोधी पक्ष भाजप या दोघांनाच त्याचा आनंद होतो. भारतात दंगली होतात तेव्हा पाकिस्तानात आयएसआयला आनंद होतो, त्यांना इस्लामी देशांकडून भारतातील मुस्लिमांचे रक्षण करण्याच्या नावाखाली पैसा मिळतो, त्यांना पैसा मिळतो तर भाजपला दंगलीमुळे मते मिळतात. जातीय दंगे घडवून भाजप फायदा घेते. त्याजोरावरच भाजपने लोकसभेत २ जागांवरून १८२ जागांचा पल्ला गाठला असा आरोपही त्यांनी केला.