भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनी यानं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असला तरी तो आयपीएलमध्ये मात्र खेळत राहणार आहे. असं असलं तरी धोनीला मात्र एक विशेष ऑफर आली आहे. भाजपाच्या राज्यसभेच्या खासदारानं धोनीसा २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. धोनीनं आतापर्यंत कोणत्याही पक्षाला जाहीररित्या समर्थन दिलं नाही. परंतु झारखंडमधील त्याची लोकप्रियता पाहता त्याची राजकीय कारकिर्दही चांगली चालू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धोनीच्या निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. “एम.एस.धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे आणि अन्य कोणत्याही बाबींमधून निवृत्ती घेत नाही. त्यानं जे कौशल्य आणि संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता क्रिकेटमध्ये दाखवली त्याची सार्वजनिक आयुष्यातही गरज आहे. त्याला २०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी,” असं स्वामी म्हणाले. परंतु यावेळी स्वामी यांनी धोनीनं कोणत्या पक्षाकडून लढलं पाहिजे, याबाबत मात्र वक्तव्य केलं नाही.

दोन वर्षांपूर्वी शाह यांची भेट

भाजपानं दोन वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीशी संपर्क साधला होता. ‘संपर्क से समर्थन’ या अभियानाअंतर्गत तत्कालिन भाजपा अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती. धोनीच्या निवृत्तीनंतर अमित शाह यांनी ट्विट केलं होतं. “मी अशी आशा करतो की येणाऱ्या दिवसांतही ते क्रिकेटसाठी आपलं योगदान देत राहतील. भविष्यातील त्यांच्या योजनांसाठी शुभेच्छा. जागतिक क्रिकेट हेलिकॉप्टर शॉटला मिस करेल,” असं अमित शाह म्हणाले होते.