scorecardresearch

Gujarat elections : भाजपचे विक्रमी सत्तासप्तक; गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, हिमाचलची सत्ता काँग्रेसकडे

गुजरातमध्ये सलग अडीच दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपने गुरुवारी ऐतिहासिक यश संपादन केले.

Gujarat elections : भाजपचे विक्रमी सत्तासप्तक; गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, हिमाचलची सत्ता काँग्रेसकडे
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पीटीआय, अहमदाबाद/ शिमला : गुजरातमध्ये सलग अडीच दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपने गुरुवारी ऐतिहासिक यश संपादन केले. राज्यात सलग सातव्यांदा विजय साकारणाऱ्या भाजपने गेल्या निवडणुकीत कडवी झुंज देणाऱ्या काँग्रेसला भुईसपाट केले आणि पहिल्यांदाच संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला एक आकडी जागांवरच रोखले. मात्र, गुजरातमध्ये अभूतपूर्व विजय मिळवणाऱ्या भाजपने हिमाचलची सत्ता गमावली आणि तिथे गुजरातच्या दारूण पराभवाने कोलमडलेल्या काँग्रेसला विजयी आधार मिळाला.

  गुजरातमध्ये १९९५ पासून सलग २७ वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपने १९८५ मधील काँग्रेसच्या माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखालील १४९ जागांचा विक्रम मोडित काढला. सुमारे ५३ टक्के मतांसह विक्रमी १५६ जागा मिळवणाऱ्या भाजपने या निकालाद्वारे पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या सात कार्यकाळांच्या  विक्रमी राजवटीशी बरोबरी साधली. गुजरातमध्ये ३१ प्रचारसभा घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा भाजपच्या या यशाने अधोरेखित केला.

गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला दोन अंकी जागांवर रोखण्यात यश मिळवलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. गेल्या वेळी ७७ जागा जिंकलेल्या या पक्षाला यावेळी केवळ १७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत प्रचाराचा धडाका उडविणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी ‘भारत जोडो’ यात्रेलाच पसंती देत मोजक्याच प्रचारसभा घेतल्या. पक्षश्रेष्ठींनी फारसा प्रचार केलेला नसला तरी १२५ जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसला मिळालेल्या १७ जागा हा पक्षाचा आतापर्यंतचा नीचांक ठरला. वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्यांबरोबरच काँग्रेसने प्रचारात केलेल्या आठ घोषणाही भाजपच्या लाटेत निष्प्रभ ठरल्या. काँग्रेसला केवळ २८ टक्के मते मिळाली असून, गेल्या वेळच्या तुलनेत त्यात १३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

या निवडणुकीत सर्वशक्तिनिशी उतरलेल्या आम आदमी पक्षाला खाते उघडता आले असले तरी चमकदार कामगिरी करता आली नाही. दिल्ली, पंजाबपाठोपाठ गुजरातमध्ये सत्ता मिळवण्याचे आम आदमी पक्षाचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, पक्षाला पाच जागांसह १३ टक्के मते मिळाली असून, पक्षाला गुजरातमधील कामगिरीमुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडल्याचे चित्र दिसले.

गुजरातमध्ये अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या भाजपला पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचलमधील सत्ता मात्र राखता आली नाही. हिमाचल प्रदेशात प्रत्येक निवडणुकीत सत्तांतराची परंपरा यावेळीही कायम राहिली. गुजरातमधील दारूण पराभवामुळे धक्का बसलेल्या काँग्रेसला ४० जागांसह हिमाचलने दिलासा दिला. तिथे भाजपला २५ जागा मिळाल्या. पराभव मान्य करून हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. राज्याच्या ६८ पैकी ६७ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नाही. गुजरातवरच लक्ष केंद्रित करणारा हा पक्ष एक टक्का मतांवरच रखडला. हिमाचलमध्ये तीन अपक्ष उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि भाजप यांच्या मतांच्या टक्केवारीत फार फरक नाही. काँग्रेसला ४३.९ टक्के, तर भाजपला ४३ टक्के मते मिळाली. हिमाचलचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांनी या विजयाचे श्रेय पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांना दिले. प्रियांका यांच्या प्रचारधडाक्यामुळे राज्यात यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

‘भूपेंद्रच्या विजयासाठी नरेंद्रची जीवतोड मेहनत’

नवी दिल्ली : अन्य पक्षांमधील घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरील राग भाजपच्या वाढत्या पाठिंब्यातून स्पष्ट झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातच्या विजयाला विक्रमांचा विक्रम असे संबोधित करतानाच ‘भूपेंद्रला विक्रम रचता यावा, यासाठी नरेंद्रने जीवतोड मेहनत घेतली,’ अशी मिश्किल प्रतिक्रियाही पंतप्रधानांनी दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयाचा येथील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, ‘‘२५ वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असतानाही गुजरातच्या जनतेने भाजपवरील प्रेम मतपेटीतून व्यक्त केले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सुविधांकडे लक्ष देत असल्यामुळे लोकांनी भाजपला मतदान केले.’’ आम आदमी पक्षावर ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ असा शेरा मारताना अल्पकालीन राजकारणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या ४०पैकी ३४ मतदारसंघांमध्ये भाजपने बाजी मारल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या मतदारांचेही आभार मानले. तिथे काँग्रेसचा विजय झाला असला तरी त्यांच्या भाजपमध्ये केवळ एक टक्का मताचा फरक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भाजप

गुजरातमध्ये विक्रमी विजय. ५३ टक्के मतांसह आतापर्यंतच्या सर्वाधिक १५६ जागा. हिमाचलमध्ये मात्र पराभवाचा धक्का.

काँग्रेस

गुजरातमध्ये दारूण पराभव. राज्यात आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा. हिमाचलमध्ये मात्रा विजयी दिलासा. ४० जागांवर विजय मिळवून बहुमत.

आप

गुजरातमध्ये चंचूप्रवेश. १३ टक्के मतांसह ५ जागा. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा. हिमाचलमध्ये मात्र खाते उघडण्यातही अपयश.

भूपेंद्र पटेल यांचा सोमवारी शपथविधी

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल हे कायम राहील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी निकालानंतर सांगितले. पटेल यांचा शपथविधी सोमवार, १२ डिसेंबरला होईल. शपथविधी सोहळय़ास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या