“राहुल गांधी गैरसमजात, पुढील अनेक दशके भाजपाचेच वर्चस्व”; प्रशांत किशोर यांचे भाकीत

राहुल गांधी भाजपा केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे

Bjp remain powerful for decades predicts poll strategist prashant kishor

पुढील अनेक दशके भारतीय राजकारणावर भाजपचे वर्चस्व राहणार आहे आणि मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चूक आहे, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. प्रशांती किशोर यांनी गोव्याच्या दौऱ्यावर असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना पुढील अनेक दशके भाजपाशी लढावे लागणार आहे. प्रशांत किशोर सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत.

वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलने विजय मिळवल्यानंतर किशोर यांनी ममता बॅनर्जींसोबत काम करत नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या, पण चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा तृणमूलसोबत काम करत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलसाठी गोव्यात पोहोचले आहेत.

अनेक दशके भाजपाच्या वर्चस्वाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींचीही खिल्ली उडवली आणि म्हणाले की, राहुल गांधी भाजपा केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात आहे.

भाजपा कुठेही जाणार नाही

गोव्यात म्युझियममधील एका कार्यक्रमादरम्यान प्रशांत किशोर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा जिंकेल किंवा हरेल, पण काँग्रेसच्या ४० वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. भाजपा कुठेही जाणार नाही. तुम्हाला भारतात ३० टक्के मते मिळाली की तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. त्यामुळे लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या चक्रव्यूहात कधीही पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजपा कुठेही जाणार नाही. पुढील अनेक दशके तुम्हाला भाजपाचा सामना करावा लागेल,” असे प्रशांत किशोर म्हणाले.

मोदींची ताकद समजून घेतली तरच त्यांचा सामना करू शकाल

“राहुल गांधींची हीच अडचण आहे. बहुधा, त्यांना असे वाटते की ही फक्त थोड्या वेळेची बाब आहे, जोपर्यंत लोक मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत तोपर्यंत. ते होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद समजून घेत नाही आणि त्यांची ताकद स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. मला दिसत असलेली अडचण अशी आहे की लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहित असेल तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल,” असे प्रशांत किशोर म्हणाले.

मोदी जाण्याची काँग्रेसवाले वाट पाहत आहेत’

“तुम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे जा, ते तुम्हाला सांगतील ही थोड्या वेळेची गोष्ट आहे. ही काळाची बाब आहे, लोक कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील. मला शंका आहे, असे होणार नाही. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही,” याचे उदाहरणही प्रशांत किशोर यांनी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp remain powerful for decades predicts poll strategist prashant kishor abn

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका