न्यूयॉर्क : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भविष्याकडे पाहण्यास अक्षम आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतकाळात (रिअरव्ह्यू मिररमध्ये) पाहत देशाचा गाडा हाकत आहेत, त्यामुळे एकापाठोपाठ एक अपघात होत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केली. न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटर येथे अमेरिकी वंशाच्या भारतीयांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी राहुल म्हणाले की, आमच्याकडे एक समस्या आहे. भाजप आणि संघ भविष्याकडे पाहण्यास अक्षम आहेत. तुम्ही त्यांना काहीही विचारा, ते भूतकाळाकडे पाहून उत्तर देतात. त्यांचा तातडीचा प्रतिसाद हा असतो की ते भूतकाळाचा संदर्भ घेतात. फक्त मागील रस्ता दाखवणाऱ्या आरशात पाहून कार चालवता येत नाही. नरेंद्र मोदी हेच करत आहेत. ते केवळ मागे बघत भारताची गाडी चालवत आहेत आणि सतत गाडी का बंद पडत आहे, पुढे का जात नाही हे त्यांना कळत नाही.




ओडिशामधील रेल्वे अपघाताचा संदर्भ घेऊन राहुल म्हणाले की, जर तुम्ही त्यांना विचारले की रेल्वेचा अपघात का झाला, तर ते म्हणतील की काँग्रेस पक्षाने ५० वर्षांपूर्वी अमुक एक गोष्ट केली होती. पाठय़पुस्तकांमधून आवर्तसारणी का वगळली असे विचारले तर काँग्रेसने ६० वर्षांपूर्वी काय केले, त्याविषयी ते बोलतात. तुम्ही त्यांच्यापैकी कोणाशीही बोला ते याच पद्धतीने विचार करतात अशी टीका राहुल यांनी केली.
या कार्यक्रमाने राहुल यांच्या अमेरिकी दौऱ्याचा समारोप झाला. ते आधी सॅन फ्रॅन्सिस्को आणि नंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये वेगवेगळय़ा कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये विशेषत: भारतीय वंशाच्या नागरिकांशी चर्चा, विद्यार्थ्यांशी संवाद, पत्रकार परिषद आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवउद्यमींशी चर्चा यांचा समावेश होता.
काँग्रेस आणि भाजपमधील लढाई ही दोन विचारसरणींची लढाई आहे. यामध्ये एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला नथुराम गोडसे आहे.
-राहुल गांधी, काँग्रेसचे नेते