नवी दिल्ली : चंडीगडमध्ये बहुमताचा आकडा नसतानाही गुरुवारी भाजपचे उमेदवार सौरभ जोशी यांची महापौरपदी निवड झाली. महापौरपद जिंकण्यासाठी १९ मतांची गरज होती, भाजपकडे फक्त १८ मते होती. तरीही, ‘आप’ व काँग्रेसच्या सदस्यांच्या मतफुटीविना भाजपने ही निवडणूक जिंकली.

‘आप’कडे ११ तर, काँग्रेसकडे खासदार मनीष तिवारींसह ७ मते होती. दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर समान मतांच्या आधारे भाजपला विजयापासून रोखता आले असते. अशा परिस्थितीमध्ये नाणेफेक करून महापौर निवडला गेला असता. आप व काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही होती. पण, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची पक्षाने पुन्हा एकदा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली व त्यानंतर चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीची समीकरणे बदलल्याचे सांगितले जाते.

‘आप’शी आघाडी केली तर तावडे आपल्या नगरसेवकांमध्ये फूट पाडतील अशी भीती काँग्रेसच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानंतर महापौर निवडणुकीतील रणनिती काँग्रेसने बदलली आणि ‘आप’शी आघाडी करण्यास नकार दिला. तावडेंच्या डावपेचांमुळे फूट पडल्यास ‘आप’ काँग्रेसवर भाजपचा ‘ब चमू’ असल्याचा आरोप करेल. त्यामुळे अपमान सहन करण्यापेक्षा काँग्रेसने पराभव स्वीकारणे पसंत केल्याची चर्चा होत आहे.

दुसरीकडे ‘आपने’ही काँग्रेसला दूषणे देत युती करणे टाळले. राजकीय परिस्थिती अनुकूल झाल्याचे लक्षात येताच भाजपने ‘आप’शी युती करण्यास नकार दिला व एकट्याने निवडणूक लढवली. ‘आप’ व काँग्रेस वेगवेगळे लढल्यामुळे भाजपकडे महापौरपदाचे उमेदवार सौरभ जोशी यांना निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ होते. तावडेंच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग पाचव्यांदा चंडीगडचे महापौरपद जिंकले आहे.