विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात केलेल्या सार्वजनिक महाभियोगावर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र भारतातील “मतचोरी”चा पहिला प्रकार खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच घडवून आणला होता आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा पंतप्रधान होण्याचा हक्क हिरावून घेतला होता, असा आरोप भाजपा खासदार संबित पात्रा यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.
“पहिली मतचोरी नेहरूंनीच केली”
राजधानी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संबित पात्रा म्हणाले, “आज विरोधक मतचोरीचे आरोप करत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे जेव्हा या विषयावर बोलत होते, तेव्हा मला त्यांना सांगावेसे वाटते की—होय, मतचोरीचा दावा अगदी खरा आहे. देशात मतचोरी नक्कीच झाली होती. आज ३१ ऑक्टोबर, आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. स्वतंत्र भारतात जर पहिली मतचोरी कोणी केली असेल, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मते चोरली.”
नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करत पात्रा पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी गुप्त मतदानाद्वारे मते दिली होती. मात्र, ती मते चोरून पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान बनले.”
प्रतीकात्मक संसद हा लोकशाहीचा अपमान
विरोधी पक्षांच्या सार्वजनिक महाभियोगाला नाटकाची उपमा देत पात्रा म्हणाले की, काँग्रेस अशा प्रकारच्या स्टंटबाजीद्वारे देशाच्या घटनात्मक संस्थांचा आणि संसदेचा अपमान करत आहे. पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेस आणि विरोधक लोकांचे लक्ष वेधण्यासाठी असले प्रकार करत आहेत.
