लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची रणनीती भाजपने आखली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. विरोधकांचा संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यामध्ये विरोधकांकडून संविधान, महागाई-बेरोजगारी, जातनिहाय जनगणना आदी भाजपला अडचणीत आणणारे विषय राहुल गांधींकडून प्रचारामध्ये धडाडीने मांडले जाण्याची शक्यता आहे. हा झंझावात अडवायचा असेल तर त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून घेरले जाऊ शकते. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचीही पंचाईत होऊ शकते. हा विचार करून भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर रणनीती आखली जात असल्याचे समजते. ‘भारत जोडो यात्रे’मध्ये राज्यात बुलढाणा येथे झालेल्या जाहीरसभेत राहुल गांधींनी सावरकरांवर तीव्र टीका केली होती. ब्रिटिशांना सावरकरांनी माफीनामा लिहून दिला होता. त्यांनी बिटिशांची मदत केली होती. अशी कथित आक्षेपार्ह टिप्पणी राहुल गांधींनी केली होती. लंडनमधील भाषणामध्येही त्यांनी सावरकरांविरोधात विधाने केली होती. या विधानांविरोधात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला असून पुणे न्यायालयात राहुल गांधींविरोधात खटलाही चालवला जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये हे सर्व प्रकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील होण्याची शक्यता आहे.
सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना माफी मागण्याची मागणी भाजपकडून तीव्र केली जाण्याची शक्यता आहे. मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही, अशी भूमिका राहुल गांधींनी लोकसभेमध्ये घेतली होती. मात्र सावरकरांचा अपमान राज्यातील जनता खपवून घेणार नाही, असा भावनिक प्रचार भाजपकडून केला जाऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा भाग असली तरी सावरकरांबाबत राहुल गांधींची मते मान्य नसल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनाही राहुल गांधींविरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
© The Indian Express (P) Ltd