भाजपला धक्का; हिमाचलमध्ये चारही जागा काँग्रेसकडे

हिमाचल प्रदेशातील निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरला.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

हिमाचलमध्ये चारही जागा काँग्रेसकडे; देगलूरमध्ये महाविकास आघाडी,

तर दादरा-नगर हवेलीमध्ये शिवसेनेचा विजय

लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला. मात्र, पुढील वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या हिमाचल प्रदेशसह अन्य काही ठिकाणी भाजपला पराभवाचा धक्का बसला. महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली विधानसभेची जागा काँगे्रसने कायम राखली, तर दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात भाजपला नमवत शिवसेनेने बाजी मारली.

देशातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि २९ विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. हिमाचल प्रदेशातील निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेल्या मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत नेते वीरभद्र्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवार ब्रिगेडिअर खुशाल चंद ठाकूर यांचा पराभव केला. हिमाचलमधील फतेहपूर आणि आरकी विधानसभा मतदारसंघ कायम राखतानाच काँगे्रसने जुब्बल-कोठाईची जागा भाजपकडून काबीज केली.

महाराष्ट्रातील देगलूर-बिलोलीची जागा काँग्रेसने कायम राखली. या निवडणुकीत पंढरपूरच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न अपयशी ठरला. हरियाणामध्ये भारतीय राष्ट्रीय लोकदलाने एलनाबादची जागा कायम राखत भाजपचा पराभव केला. मात्र, तिथे भाजप उमेदवाराला विक्रमी मते मिळाली.

राजस्थानमधील दोन्ही जागा काँगे्रसने जिंकल्याने तिथे पक्षाचे संख्याबळ १०८ वर पोहोचले. या दोनपैकी एक जागा आधी काँगे्रसकडेच होती, तर दुसरी जागा या पक्षाने भाजपकडून हिसकावली.

कर्नाटकमध्ये भाजप आणि काँगे्रसने प्रत्येकी एक जागा जिंकली. राज्यातील जवळपास २० मंत्र्यांना प्रचारात उतरवूनही भाजपला हंगलची जागा गमवावी लागली. तिथे बाजी मारल्याने आगामी निवडणुकीत काँगे्रसच सत्तेवर येईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला.

मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यात भाजपला यश आले. शिवाय, तिथे काँगे्रसच्या ताब्यातील विधानसभेच्या दोन जागा भाजपने जिंकल्या. मात्र, एक जागा भाजपने गमावली असून, तिथे काँगे्रसने विजय मिळवला. आसाममध्ये भाजपप्रणीत आघाडीने सर्व म्हणजे पाचही जागा जिंकल्या. पाचपैकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. बिहारमध्ये राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना प्रचारात उतरवूनही या पक्षाला दोन्ही जागांवर संयुक्त जनता दलाकडून पराभव पत्करावा लागला.

कौल असा…

विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीने २९पैकी १४ जागा जिंकल्या. त्यात भाजपच्या सात जागांचा समावेश आहे. काँगे्रसला आठ जागा मिळाल्या.

तृणमूल कॉंगे्रसने विजयी घोडदौड कायम राखत पश्चिाम बंगालमधील चारही जागांवर विक्रमी विजय मिळवला. पोटनिवडणुकीत या पक्षाला ७५.०२ टक्के मते मिळाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp shock congress to four seats in himachal voters in lok sabha and assembly by elections akp

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या