काँग्रेसचा उल्लेख ‘खुनी पंजा’ करण्यापूर्वी भाजपने गुजरातमधील २००२च्या दंगलींची आठवण ठेवावी, असा सल्ला माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी दिला. ४४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तिवारी आले होते. त्या संदर्भात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. मात्र चर्चेचा केंद्रबिंदू मोदीचा राहिला. तिवारी यांनी प्रश्नांना उत्तरे देताना मोदींना लक्ष्य केले.
गुजरात दंगलीच्या वेळी मोदींचे वर्तन लक्षात ठेवा अशी विनंती मी भाजपमधील मित्रांना करतो, तसेच काँग्रेसवर टीका करणाऱ्या वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द आठवावी अशी टीका तिवारींनी केली. हिटलर आणि मोदी यांची तुलनाही तिवारींनी या निमित्ताने केली. हिटरलने जसा बर्लिन ऑलिम्पिकचा वापर ब्रँड जर्मनी तयार करण्यासाठी केला तसेच मोदींनीही भारतीय चित्रपटाच्या शताब्दीनिमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीने आपला ब्रँड तयार करण्याची संधी घालवली असे मत व्यक्त केले होते, त्याची आठवण करून दिली.
तसेच गुजरातमधील महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी भाजप जो त्या महिलेला सुरक्षा दिल्याचा बचाव करत आहे तो हास्यास्पद असल्याची टीका तिवारींनी केली. अर्थात याबाबत मोदींचा राजीनामा मागण्यात काही अर्थ नाही. त्यांच्याकडे नैतिकता असती तर २००२ मध्येच त्यांनी राजीनामा दिला असता, असा टोला तिवारींनी लगावला.
गुरू-शिष्यामधील संघर्ष
अण्णा हजारे-अरविंद केजरीवाल यांच्यातला संघर्ष गुरू-शिष्यामधील आहे. आमच्या दृष्टीने तो प्रतिक्रिया देण्याचा विषय नाही. मात्र गुरू हा शिष्यापेक्षा कमी नाही निघाला हेच यातून दिसले. मात्र खरा प्रश्न आहे जे मुलींवर पाळत ठेवतात त्यांच्या हाती सत्ता देणार काय? असे विचारत या मुद्दय़ावर काँग्रेस मोदींना लक्ष्य करणार हे स्पष्ट झाले.