बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची आठव्यांदा शपथ, उपमुख्यमंत्रीपदी तेजस्वी प्रसाद

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीशकुमार यांनी बुधवारी आठव्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर ७१ वर्षीय मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला, की त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०२४च्या निवडणुकीची चिंता करावी.

शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीशकुमार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, भाजपकडून संयुक्त जनता दलाला कायम हरवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मी मुख्यमंत्री होऊ इच्छित नव्हतो, परंतु दबाव आणण्यात आला. त्यानंतर काय काय झाले, हे आपण पाहातच आहात. आगामी लोकसभा निवडणुकीत आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असाल का, या प्रश्नावर नितीशकुमार यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधानपदावर माझा कोणताही दावा नाही.

विरोधी पक्षांच्या राजकारणाला प्रबळ करण्यासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नावर नितीशकुमार यांनी सांगितले की, विरोधी पक्षांचा विरोध प्रबळ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यापूर्वीही आपण हा प्रयत्न केला होता. सर्व विरोधकांनी एकत्र येत एकजूट दाखवत प्रबळ व्हावे, ही माझी इच्छा आहे. देशातून विरोधी पक्ष नष्ट व्हावेत, असे काही जणांना वाटते. परंतु आता आम्हीही विरोधी पक्षात सामील झालो आहोत. ज्यांना २०१४ मध्ये विजय मिळाला, त्यांनी आता २०२४च्या निवडणुकीची चिंता करावी. जे २०१४ला निवडून आले होते, ते २०२४ नंतर राहतील की नाही, असा सवाल त्यांनी विचारला. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींमध्ये काय फरक आहे? असे विचारल्यावर नितीशकुमार म्हणाले की, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी आणि तत्कालीन अन्य नेते यांनी दिलेले प्रेम आम्ही कधी विसरणार नाही. त्या वेळची गोष्ट वेगळीच होती. आर.सी. पी. सिंग या आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्याचे नाव न घेता नितीशकुमार म्हणाले की, एका व्यक्तीलाच त्यांनी सगळी जबाबदारी दिली. ते आमच्या पक्षात न राहता पक्ष सोडून निघून गेले.

शपथविधीपूर्वी लालूप्रसाद यांच्याशी चर्चा

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली. लालूप्रसाद यांची कन्या व खासदार मिसा भारती यांनी सांगितले की, लालूप्रसाद यांनी नितीशकुमार यांच्या या निर्णयाचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. लालूप्रसाद सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीत मिसा भारती यांच्याकडे वास्तव्यास आहेत. त्यांची तब्येत बरी होत आहे. एके काळी लालूप्रसाद यांचे नितीशकुमार हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी होते. बिहारमध्ये २०१५च्या विधानसभा निवडणुकीआधी नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांच्यासह आघाडी केली होती. राजद आणि जदयूची ही आघाडी त्या वेळी विधानसभा निवडणूक जिंकली होती. आता सात वर्षांनंतर पुन्हा नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी केली आहे.