BJP targeting Abhijit Dipke PM Cares Fund demand: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधार करण्यासाठी ‘शाळा ठीक करा’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत स्वतः अभिजीत दिपके हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळांची पाहणी करत आहेत. तर सीजेपीचे इतर सहकारी त्या त्या राज्यात अशाप्रकारची पाहणी करत आहेत. या पाहणीत शाळांमधील दुरवस्था सोशल मीडियावर दाखवली जात आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शाळांच्या उभारणीसाठी पीएम केअर्स फंडाचा वापर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर आता भाजपाने टीका केली आहे.
भाजपा गोवाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून अभिजीत दिपकेंसह ‘आप’ पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही लक्ष्य केले आहे. कॉक्रोच जनता पार्टी हा ‘आप’चा पेट प्रोजेक्ट असून अरविंद केजरीवाल यांनी दिपकेंना व्यवस्थित प्रशिक्षण दिले नसल्याचा आरोप गोवा भाजपाने केला आहे.
“पीएम केअर्स फंड हा आपत्कालीन आणि आपत्तीसारख्या परिस्थितीत वापरण्यासाठी राखीव आहे. केजरीवाल तुम्ही तुमच्या माणसांना नाटकीपणा चांगला शिकवला आहे, पण त्यांना वस्तुस्थितीची माहिती कशी घ्यावी, हे शिकवले नाही. याबद्दल बिलकूल आश्चर्य वाटत नाही”, अशी टीका भाजपाने एक्सवर केली आहे.

अभिजीत दिपके यांनी आम आदमी पक्षाचे सरकार असलेल्या पंजाबमध्ये जाऊन तिथल्या शाळांची परिस्थिती दाखवावी, असेही आव्हान गोवा भाजपाने दिले आहे. केजरीवालांचा उल्लेख करताना एक्स पोस्टमध्ये पुढे म्हटले, “तुम्ही दिपकेंना पंजाबमध्ये कधी घेऊन जाणार आहात? तुमच्या पंजाबमधील कथित जागतिक दर्जाच्या शाळांचीही पाहणी करू द्या. पंजाबची जनता या शाळांमुळे त्रस्त झाली आहे.”
दिपकेंनी पीएम केअर्स फंड वापरण्याची मागणी केली
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपके यांनी दोन दिवसांपूर्वी पीएम केअर्स फंड शाळांसाठी वापरण्याची मागणी केली होती. ते म्हणाले, “एका लेखापरीक्षण अहवालानुसार, ३१ मार्च २०२५ रोजी ‘पीएम केअर्स’ निधीमधील एकूण शिल्लक ८,४५२ कोटी रुपये आहे. यातील रक्कम गेल्या काही वर्षांत फारशी खर्च करण्यात आलेली नाही.”
२०२४-२५ या वर्षात पीएम केअर्स फंडात ७,१७३ कोटी रुपये होते. ज्यात यावर्षी १७.८ टक्क्यांची वाढ होऊन ते ८,४५२.७ कोटींवर पोहोचले आहेत, अशी माहिती या लेखापरीक्षण अहवालात आल्याचे दिपके यांनी सांगितले.

“पीएम केअर्स फंडातील पैसा मुलांच्या शाळांसाठी का वापरत नाही? जर सर्व सुविधांनीयुक्त एका शाळेच्या बांधकामाचा खर्च साधारण ८ कोटी रुपये पकडला, तर ८,५०० कोटी रुपयांमध्ये १,००० हून अधिक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण शाळा बांधल्या जाऊ शकतात, मात्र असे होत नाही”, असेही अभिजीत दिपके म्हणाले होते.
‘शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यावे’ – दिपके
शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यायला हवे. पण त्यांच्या मागे बारा कामे लावली आहेत. जर ‘एसआयआर’ करायचे आहे तर सरकारने नवी भरती करावी. तेवढीच बेरोजगारी कमी होईल. अनेक शिक्षकांना शाळेवर यायचे आहे. पण सरकार त्यांच्याकडून अशी कामे करुन घेत आहे. शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम करू द्या, अशी भूमिका कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी लातूर जिल्ह्यातील उजनी येथे शाळा भेटीनंतर मांडली.
