माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेवर झालेल्या हल्ल्यातील अफजल गुरूच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. अफजल गुरुबाबत घेतलेला निर्णय कदाचित योग्य नव्हता. फाशीऐवजी त्याला विनापॅरोल जन्मठेपेची शिक्षा ठोठावायला हवी होती, असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे.
‘अफजल गुरुबाबतचा निर्णय योग्य पद्धतीने घेतला गेला नाही. २००१मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात त्याचा कितपत सहभाग होता, याबाबतही शंका आहे. मी त्यावेळी गृहमंत्रिपदी असतो, तर काय निर्णय घेतला असता, हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मात्र, चिदंबरम यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळातच अफजल गुरूची दया याचिका फेटाळण्यात आली होती. दरम्यान, या विधानामुळे अपेक्षेप्रमाणे वाद निर्माण झाला असून भाजपने त्यांचे हे विधान दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. हा संसदेवरील हल्ल्यादरम्यान शहीद झालेल्या हुतात्म्यांचा आणि न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.