इंधन दरवाढीमुळे देशातील बर्‍याच राज्यात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या वर गेली आहे. यामुळे अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्राला धारेवर धरले आहे. केंद्राकडून मात्र यूपीएसरकारच्या चुकीमुळे हे दर वाढत असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान, भाजपाच्या प्रवक्त्यांनी मात्र या दरवाढीवर अजब विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी निवडूण आले असल्याचे म्हटले आहे.

दिल्ली भाजपा प्रवक्त्या सारिका जैन यांनी शुक्रवारी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले. सारिका जैन यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक, कलम ३७० रद्द करून अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सुरुवात करुन असे काम केले आहे, ज्यासाठी इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल.

काँग्रेसच्या सरकारमुळेच इंधन दरवाढीचा भडका उडालाय; पेट्रोलियम मंत्र्यांचा आरोप

“ज्यांना असे वाटते की पंतप्रधान कांदा, टोमॅटो, कांदे आणि पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आले आहेत त्यांनी दूर रहावे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले आहेत. ते अयोध्येत राम मंदिर तयार करण्यासाठी, लाखो खेड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि मुस्लिम बहिणींना तिहेरी तलाकातून मुक्त करण्यासाठी आले आहेत,” असे जैन यांनी म्हटले आहे.

जैन म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सात वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील बर्‍याच भागात ३५ विमानतळे बांधण्यासाठी, अनेक एम्स रुग्णालये बांधण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी, प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी, प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आले आहेत.” त्या म्हणाल्या, देशातील जनतेने ही कामे पाहिली पाहिजेत आणि समजून घेतलं पाहिजे की, या विकासाशी संबंधित कामांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे.

हे ही वाचा >> इंधन दरवाढीवर उर्जामंत्री म्हणाले, “सायकल चालवा, आरोग्य सुधारा”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरुच

रविवाराही इंधन दरवाढीचे सत्र कायम असून, दिल्लीत पेट्रोलदर शंभरीच्या उंबरठय़ावर पोहोचले होते. मुंबईत पेट्रोल लिटरमागे १०५.५८ रुपये, तर डिझेल ९६.९१ रुपयांवर गेले. तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल दरात ३५ पैसे तर डिझेल दरात १८ पैशांनी वाढ केली. गेल्या दोन महिन्यांतील पेट्रोलच्या किमतीतील ही ३४ वी, तर डिझेलच्या किमतीतील ३३ वी वाढ ठरली. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी इंधनदरांनी शंभरी पार केली आहे.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर ४ मेपासून पुन्हा इंधनदरवाढ सुरू करण्यात आली. दोन महिन्यांत पेट्रोलदरात ९.११ रुपये, तर डिझेलदरात ८.६३ रुपयांनी वाढ करण्यात आली.

पेट्रोलची शंभरी कुठे?

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब आदी ठिकाणी पेट्रोलने आधीच शंभरी गाठली होती. रविवारी या यादीत सिक्कीमची भर पडली आहे.