२०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता स्थापन केली. आता २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपाने जयपूरमध्ये एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती, आवश्यक संघटनात्मक बदल आणि तयारी यावर चर्चा होणार आहे. २० आणि २१ मे रोजी जयपूरमध्ये होणाऱ्या या बैठकीत पक्षाने देशभरातील पदाधिकाऱ्यांना बोलावले आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये वर्षभरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागून आहेत. सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक २० मे रोजी, तर सरचिटणीसांची बैठक २१ मे रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपाने याला दुजोरा दिला आहे.

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची रणनिती, जयपूरच्या बैठकीत पंतप्रधान मोदी देणार विजयी मंत्र!

“बैठकीत लवकरच होणाऱ्या राज्यांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा होणार आहे. पक्षाने संघटना मजबूत करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांवर सविस्तर चर्चा केली जाईल,” असे सूत्रांनी सांगितले. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीला दोन्ही राज्यातील अनेक नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते.