श्रीनगर : ‘नॅशनल कॉन्फरन्स’ आणि काँग्रेस यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले तर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्यापासून भाजप वंचित राहील. त्यामुळे त्रिशंकू विधानसभेतच भाजपचा फायदा असेल आणि त्यासाठी भाजपने अत्यंत सावधपणे पावले टाकली असल्याचे मानले जात आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेत ९० जागा असून बहुमताचा आकडा ४६ आहे. काश्मीर खोऱ्यात ४७ जागा असून जम्मू विभागामध्ये ४३ जागा आहेत. खोऱ्यामध्ये काँग्रेसला एखाद-दोन जागा जिंकता येतील. काँग्रेसला जम्मू विभागामध्ये तर, काश्मीर खोऱ्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सला (एनसी) अधिकाधिक जागांवर विजय मिळवावा लागेल. पण, खोऱ्यामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’, इंजिनीअर रशीद यांची अवामी इत्तेहाद पार्टी, सज्जाद लोन यांची पीपल्स कॉन्फरन्स, अल्ताफ बुखारी यांनी अपनी पार्टी, मेहबुबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असलेले काही अपक्ष असे सगळे मिळून १५-१७ उमेदवार जरी जिंकून आले तर नॅशनल कॉन्फरन्सच्या विजयी जागांची संख्या ३० पेक्षा जास्त नसेल. अशा स्थितीत जम्मू विभागामध्ये काँग्रेसला किमान १५ जागा तरी जिंकाव्या लागतील. तरच नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळेल आणि ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनू शकतील. पण, तसे झाले नाही तर २०१४ प्रमाणे भाजप सत्तेतील वाटेकरी होईल असा कयास बांधला जात आहे.
हेही वाचा >>> RSS सरकार्यवाह होसबळेंची वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी भेट, पूरम उत्सवात गोंधळ आणि भाजपाचा विजय – काँग्रेसचा गंभीर आरोप
जम्मूमध्ये भाजपवर जनता कितीही नाराज असली तरी सक्षम पर्यायाअभावी मतदार पुन्हा भाजपलाच मते देतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. जम्मू विभागामध्ये भाजपने २५-३० जागा जिंकल्या तर जम्मू-काश्मीरची विधानसभा त्रिशंकू होईल. मग, भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील, असे मानले जात आहे. ‘नॅशनल कॉन्फरन्स’ने काँग्रेसशी युती केली असली तरी, त्रिशंकू अवस्थेत ‘एनसी’ भाजपसोबत सरकार बनवू शकते अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. ‘एनसी’ची भाजपच्या नेत्यांशी समांतर बोलणी सुरू असल्याची कुजबूज आमच्याही कानावर आली आहे’, अशी कबुली जम्मूतील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
‘जम्मू-काश्मीरमध्ये कोणालाही बहुमत मिळणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप सरकारमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम मुख्यमंत्री असलेले कडबोळे सरकार स्थापन केले जाईल’, असा दावा एका माजी मंत्र्याने केला. २०१४मधील पीडीपी-भाजप सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. हे माजी मंत्री मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत. केंद्र सरकारच्या सहमतीने ‘जमात’ निवडणुकीत उतरली आहे. इंजिनीअर रशीद यांना भाजपचे आशीर्वाद असल्याचे मानले जाते. पीडीपी आणि इतर छोटे पक्ष तसेच अपक्ष यांच्याशी बोलणी यशस्वी झाली तर त्रिशंकू विधानसभेत पुन्हा भाजपचा समावेश असलेले सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राम माधवांची भूमिका निर्णायक?
भाजपने जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीची जबाबदारी पुन्हा राम माधव यांच्याकडे दिली आहे. त्रिशंकू अवस्थेत सरकार बनवण्यासाठी गरजेची असलेली जुळवाजुळव ते करू शकतात. २०१४मध्ये स्थापन झालेल्या पीडीपी-भाजप सरकारचे जनक माधवच होते. त्यांचा जम्मू-काश्मीरमध्ये विविध घटकांशी ‘योग्य संवाद’ असल्याचे मानले जाते. राम माधव यांच्याकडे जबाबदारी दिल्यामुळे भाजप व पीडीपी यांच्यामध्येही पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता असल्याचा दावा काही ज्येष्ठ विश्लेषकांनी केला. (क्रमश:)
© The Indian Express (P) Ltd