BJP supporters chant ‘Jai Shri Ram’ outside CM Mamata Banerjee’s residence: आज सकाळी ८ वाजल्यापासून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू आहे. या सर्व राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबतचे चित्र आता बऱ्याच अंशी स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे.

समोर येत असलेल्या कलांसोबतच, निवडणूक आयोगाकडील अधिकृत आकडेवारीही आता प्राप्त होऊ लागली आहे. या आकडेवारीनुसार, भाजपाने बहुमताचा आकडा पार केला असून, राज्यात पहिल्यांदाच भाजपाचे सरकार स्थापन होणे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. परिणामी, पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये सध्या उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.

ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर ‘जय श्री राम’चे नारे

निवडणुकांमध्ये टीएमसी खूप मोठ्या पिछाडीवर पडली आहे. पक्षाचे अनेक मंत्रीही पिछाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपा कार्यकर्त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये दोन दुचाकींवर गळ्यात भगवे मफलर असलेले तरुण ममता यांच्या निवासस्थानाबाहेर जय श्रीरामच्या घोषणा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

निकालावर ममता यांची प्रतिक्रिया

मतमोजणी सुरू असताना आणि तृणमूल काँग्रेस पिछाडीवर असतानाच, ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ममता यांनी निवडणूक आयोगावर अयोग्यरित्या वागत असल्याचा आरोप केला असून, ज्या मतदारसंघांमध्ये सध्या त्यांच्या पक्षाची आघाडी आहे, तिथे मतमोजणीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याच वेळी, ममता यांनी आपल्या पक्षाच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मतमोजणी अद्यापही सुरूच आहे आणि मतमोजणीची अंतिम फेरी पूर्ण झाल्यानंतर, त्यांचे सरकार नक्कीच स्थापन होईल.

भाजपा ऐतिहासिक विजयाकडे

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. एका जागेसाठी (फल्टा) २१ मे रोजी फेरनिवडणूक घेतली जाईल. सुरुवातीच्या कलानुसार, भारतीय जनता पार्टी १७६ जागांवर आघाडीवर आहे, तर तृणमूल काँग्रेस ९१ जागांवर आघाडीवर आहे.