आगरतळा : त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. रविवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये ३३४ प्रभागांपैकी ३२९  प्रभाग जिंकल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. तृणमूल काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचा राज्यात दारुण पराभव झाला आहे.

त्रिपुरात २०१८ मध्ये सत्तेत आल्यानंतर पहिलीच स्थानिक निवडणूक लढणाऱ्या भाजपने मोठा विजय मिळवला आहे. जातीय तणाव, हिंसाचार तसेच सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकीचा मुद्दा गेला होता. या साऱ्या घटनांमुळे या निकालाला महत्त्व होते.  त्रिपुरात अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला केवळ तीन प्रभागांमध्ये विजय मिळाला, तर तृणमूल काँग्रेस व अपक्षाला एका ठिकाणी यश मिळाले. आगरतळा महापालिका निवडणुकीत भाजपने सर्व म्हणजे ५१ जागाजिंकल्या. विरोधी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच तृणमूल काँग्रेसला येथे एकही जागाजिंकता आली नाही.

 कोवई नगरपालिकेत सर्व १५, तर बेलोनिया नगरपालिकेत १७, कुमारघाट नगरपालिकेत १५, तर सबरुम नगर पंचायतीमध्ये सर्व ९ जागाजिंकल्या. याखेरीज धरमनगरमध्ये सर्व २५ प्रभागांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. भाजपने सर्व ३३४ प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यात आगरतळा महापालिका, १३ नगरपालिका तसेच सहा नगरपंचायतींसाठी मतदान झाले. ११२ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.

भाजपने या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. तर माकपने पाच नगरपालिकांमध्ये फेरमतदानाची मागणी केली आहे. हा विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री बिपलब कुमार देव यांनी व्यक्त केली आहे. त्रिपुराला बदनाम करणाऱ्यांना मतदारांनी चोख उत्तर दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या विजयाचा जल्लोष शेजारील राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये करण्यात आला. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्रिपुरात आमचे फारसे अस्तित्व नाही, त्यामुळे हा निकाल अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विजयाबद्दल आभार मानले आहेत.