BJP Tamil Nadu Manifesto focuses on women empowerment with Rs 2000 monthly allowance and free LPG : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यावेळई अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचे आश्वासन देत अनेक घोषणा केल्या, तसेच सत्ताधारी डीएमकेववर जोरदार टीका देखील केली.

या प्रसंगी बोलताना नड्डा यांनी तामिळ नववर्षाच्या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध करणे शुभ असल्याचे तसेच, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच नड्डा पुढे म्हणाले की, तमिळनाडू हे जगातील सर्वात जुन्या संस्कृतीचे उगमस्थान आहे. तसेच त्यांनी त्यांनी तिरुवल्लुवर आणि सुब्रमण्यम भारती यांसारख्या व्यक्तिमत्वांचा उल्लेख करत तेथील सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान व्यक्त केला.

कल्याणकारी योजनांच्या घोषणांबद्दल बोलयचे झाल्यास, भाजपाने महिला कुटुंबप्रमुखांना दर महिन्याला २ हजार रुपये, वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर आणि करामध्ये झालेली वाढ तसेच वाढत असलेली महगाई यासाठी प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपयांची एकरकमी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. याबरोबरच भाजपाच्या जाहीरनाम्यात पात्र महिलांना ई-स्कूटर खरेदीसाठी २५ हजार रुपयांची सब्सिडी, जलिकट्टू बैल सांभाळणाऱ्यांना दर महिन्याला २ हजार रूपयांची मदत आणि यामध्ये सहभागी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या महिलांना स्टॅम्प ड्युटीमध्ये टक्के सवलत देखील दिली जाणार आहे. १० हजार रूपयांची घरगुती मदत देण्याची योजना आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी ८ हजार रुपयांच्या कूपनसह इतर कायम सुरू राहणाऱ्या योजनांची घोषणा यावेळी करण्यात आली.

तसेच मोठ्या मंदिरांमध्ये स्थानिक रहिवाशांसाठी दररोज दोन तास दर्शनासाठी विशेष राखीव वेळ ठेवण्याचा प्रस्ताव देखील यावेळी भाजपाकडून मांडण्यात आला. तसेच, तिरुपरनकुंद्रम टेकडीवर दीपोत्सवासह कार्तिगई दीपमची परंपरा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यातील प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना नड्डा यांनी असा आरोप केला की, तामिळनाडूमध्ये अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांनी डीएमकेवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा आरोप केला. पैशांच्या बदल्यात नोकरी देणे तसेच टेंडरशी संबंधित अनियमितता यांसारख्या कथित घोटाळ्यांमध्ये त्यांनी डीएमकेच्या नेत्यांची नावे घेतली आणि सत्ताधारी पक्ष भ्रष्टाचारी लोकांचे रक्षण करत असल्याचा आरोप केला.

भाजपाने पोलिस यंत्रणा मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये झिरो एफआयआरची अंमलबजावणी करणे, गंभीर गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि बस, शाळा आणि विद्यापीठांमध्ये १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या गोष्टींचा समावेश आहे.