बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडते आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलला जाणार यात आता शंका राहिलेली नाही. दरम्यान याच मुद्द्यावरुन लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी नितीश कुमारांच्या विरोधात एक खोचक पोस्ट लिहिली आहे.
रोहिणी आचार्य काय म्हणाल्या?
रोहिणी आचार्य त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, “आपल्या माणसांशी वारंवार फसवणुकीने वागणारे नितीश कुमार आता जे काही घडतंय त्याला जबाबदार आहेत. जे दुसऱ्यांचा विश्वासघात करतात त्यांना त्याची फळं भोगावी लागतात. आज तेच नितीश कुमार भोगत आहेत. राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेण्यासाठी भाजपाने नितीश कुमार यांना भाग पाडलं. असं काहीतरी घडणार हे २८ जानेवारी २०२४ ला निश्चित झालं होतं. कारण पलटी मारण्यात पटाईत असलेल्या नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आणि खुर्चीला चिकटून राहण्यासाठी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. आता ते भाजपाच्या हाततले कळसूत्री बाहुले झाले आहेत.” असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमधे त्या पुढे म्हणतात, “महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची जी अवस्था भाजपाने केली त्यापेक्षा नितीश कुमारांची अवस्था वाईट झाली आहे. भाजपा मित्रपक्षांची कबर खोदणारा पक्ष आहे. अशाच भाजपाच्या मांडीवर जाऊन नितीश कुमार बसले आहेत. शिवाय मला वाटतं की नितीश कुमार यांची काहीतरी दुखरी नस भाजपाच्या हाती लागली आहे. त्यामुळेच भाजपाचा हा तुघलकी आदेश त्यांनी मान्य केला आहे. नितीश कुमारांची राजकीय समज, विचार करण्याची शक्ती सगळं काही संपुष्टात आलं आहे. त्यामुळे भाजपा सांगेल त्याप्रमाणेच ते वागत आहेत. “
नितीश कुमार राज्यसभेवर जाणार
दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत मुख्यमंत्रीपदावर आरूढ असलेले नितीश कुमार आता राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या निर्णयामागचा विचार स्पष्ट केला आहे. तसेच नव्या सरकारला त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन राहिल, असाही शब्द दिला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीला अवघे ४ महिने होताच नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र त्यांनीच या मागची भूमिका स्पष्ट केली आहे. नितीश कुमार म्हणाले, “मागच्या दोन दशकांपासून बिहारच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला समर्थन दिले. याच बळावर आम्ही बिहारची सेवा केली. जनतेच्या विश्वास आणि समर्थनामुळेच बिहार आज विकासाच्या वाटेवर आहे. यासाठी मी अनेकदा जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.”
बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण?
चार महिन्यांपूर्वी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय प्राप्त झाला होता. भाजपा आणि जदयूच्या आघाडीने २४३ पैकी २०० हून अधिक जागा जिंकून भक्कम बहुमत प्राप्त केले होते. त्यातही भाजपा मोठा पक्ष ठरूनही मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांन दिले गेले होते. आता अवघ्या चार महिन्यात नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होत असल्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
