अमित शहा-पंतप्रधानांकडून आश्वासनांना बगल; वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षांचा प्रयत्न
महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला वागणूक देण्याची रणनीती आखली आहे. महाराष्ट्रात युतीसंबंधी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेसाठी केवळ स्थानिक नेत्यांना पाठवणाऱ्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चेसाठी प्रदेश अध्यक्षांवर जबाबदारी सोपवली आहे. तर मेहबुबा यांना सत्तास्थापनेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून आश्वासने हवी आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला दुय्यम वागणूक दिल्यामुळे युतीत आजही कुरबुरी सुरू आहेत. त्याचीच पुनरावृत्ती जम्मू-काश्मीरमध्ये होण्याची शक्यता आहे.
अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरसंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार प्रदेश अध्यक्ष निर्मल सिंह यांना सोपवले आहेत. निर्मल सिंह यांनी मेहबुबा यांना यापूर्वीच सत्तास्थापनेत नवीन अटी न लादण्याची विनंती केली होती. दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युतीचे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी झालेली पदांची वाटणी पुन्हा करावी, अशी भूमिका निर्मल सिंह यांनी घेतली होती. परंतु मेहबुबा यांनी सत्तास्थापनेपूर्वी पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष शहांशी चर्चा करण्याची मागणी केली.
शहा यांनी ही मागणी धुडकावली. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी भाजपच्या या दोन्ही सर्वोच्च नेत्यांचा संवाद होता. यापुढे मात्र प्रदेश स्तरावरील नेते चर्चा करतील, असा संदेश शहा यांनी पाठवला आहे. पीडीपी व भाजपमध्ये वाढलेल्या कुरबुरीचे हेच प्रमुख कारण असल्याचा दावा सूत्रांनी केला. निर्मल सिंह यांच्यावर सारी जबाबदारी सोपवली आहे. सध्या तरी भाजपने पीडीपीच्या अटी न मानण्याचे ठरवले आहे.

‘जम्मू-काश्मीरमध्ये अनिश्चितता’
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याबाबतच्या अनिश्चिततेचे खापर भाजपने मंगळवारी पीडीपीवर फोडले. पीडीपीच्या दुराग्रही भूमिकेमुळे अनिश्चिततेचे वातावरण असून भाजप आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाशी बांधील असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. भाजपने आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा हट्ट धरला आहे, मात्र पीडीपी दुराग्रही भूमिका घेत आहे, असे पक्षाचे राज्य सरचिटणीस अशोक कौल यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल एन. एन. वोरा यांची भेट घेतली, तेव्हा राज्यपालांनी भाजप आणि पीडीपीने सरकार स्थापनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सांगितले.

मेहबूबा यांच्याकडून सरकार स्थापनेच्या रणनीतीवर मौन
जम्मू : पीडीपीच्या नेत्या मुफ्ती मेहबूबा यांनी मंगळवारी राज्यपाल एन. एन. वोरा यांची भेट घेतली असली तरी सरकार स्थापनेबाबतची रणनीती गुलदस्त्यातच ठेवली. मेहबूबा यांनी भाजपसमोर काही अटीही ठेवल्या असून त्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल अशा उपाययोजना केंद्राने हाती घ्याव्या, असे म्हटले आहे.
सरकार स्थापनेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यपालांनी मेहबूबा यांना निमंत्रण दिले होते. त्यानंतर मेहबूबा यांनी वार्ताहरांना सांगितले की, काश्मीर हे अन्य राज्यांपेक्षा वेगळे आहे त्यामुळे तेथे सरकार स्थापन करावयाचे असल्यास पोषक वातावरण आणि उत्तेजन देणारी स्थिती निर्माण होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
आपल्या राजकीय कारकीर्दीचा विचार न करता आपल्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी केली. केंद्र सरकार राज्याला कठीण स्थितीतून बाहेर काढील असा त्यांना विश्वास होता, असे मेहबूबा म्हणाल्या.