प. बंगालमध्ये भाजप-तृणमूलचे परस्परांवर आरोप

ममतांचे भाचे हेच राज्यातील ‘एक खिडकी’- मोदी

पीटीआय, खरगपूर     (पश्चिम बंगाल) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ममता यांचे भाचे अभिषेक हेच राज्यातील ‘एक खिडकी’ असून त्यांना ओलांडल्याविना कोणतेही काम होत नाही, असे या वेळी मोदी म्हणाले.

ममता बॅनर्जी या जणू क्रूरतेची शाळा चालवत असून खंडणी, दलाली, अराजक हा त्या शाळेतील अभ्यासक्रम आहे, आदिवासींना तेंंदू पत्त्यांची विक्री करण्यासाठीही दलाली द्यावी लागते, असा आरोपही मोदी यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये तीन दिवसांत दुसऱ्या जाहीर सभेत मोदी म्हणाले की, राज्यातील उद्योग बंद पडत चालले असून सिंडिकेट संस्कृती आणि माफिया राज फोफावले आहे. ममता बॅनर्जी या खंडणीखोर आणि भ्रष्ट लोकांच्या प्रशासनाच्या प्रमुख आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

मतांच्या राजकारणासाठी ममता तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत, औद्योगिक संकुले बंद पडत चालली आहेत. उद्योग पुन्हा सुरू व्हावे यासाठी एक खिडकी पद्धत सुरू करण्यात आली आहे, भाजपने सुरू केलेल्या एक खिडकी पद्धतीमुळे उर्वरित देशात विकास होत आहे. पश्चिम बंगालमध्येही एक खिडकी पद्धत आहे, अभिषेक बॅनर्जी नावाची ही एक खिडकी असून ती ओलांडल्याविना कोणतेही काम होत नाही, असेही मोदी यांनी अभिषेक यांचा नामोल्लेख न करताच सांगितले. राज्यातील पंचायत निवडणुकीपासून आतापर्यंत भाजपच्या १३० कार्यकत्र्यांची तृणमूलच्या कार्यकत्र्यांनी हत्या केली त्याचाही या वेळी मोदी यांनी उल्लेख केला.