नवी दिल्ली : गोव्यातील काँग्रेसच्या ११पैकी ८ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय ‘चिखलफेक’ सुरू झाली आहे. गोव्यातच नव्हे तर, भाजपने पंजाबमध्येदेखील ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही केला आहे.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह ८ काँग्रेस आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर, ‘ही काँग्रेस छोडो यात्रा असून त्याची सुरुवात गोव्यामधून झाली आहे’, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे. त्यावर, काँग्रेसने आक्रमक शाब्दिक हल्लाबोल केला. ‘भारत जोडो’ यात्रेला बदनाम करण्याची मोहीम भाजपने आखली असून दररोज कोणती ना कोणती चुकीची, गैरसमज पसरवणारी माहिती भाजपकडून पसरवली जात आहे. भाजपच्या गलिच्छ प्रकाराला काँग्रेस पुरून उरेल. ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेले यश हाणून पाडण्यासाठी भाजपने गोव्यात फोडाफोडीचे राजकारण केले आहे, असा आरोप काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केला.

हेही वाचा >>> “अजित पवारांना मुख्यमंत्री करा” सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर, उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या…

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्याने भाजपच्या मनात धडकी बसली आहे. त्यामुळे काँग्रेसचे राजकीय नुकसान करण्यासाठी भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. गोव्यातील आमदारांना आमिषे दाखवून भाजपमध्ये खेचून आणण्याचा हा प्रकार म्हणजे ‘चिखल मोहीम’ असल्याची उपहासात्मक टिप्पणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केली.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, कर्नाटक आदी राज्यांमध्ये भाजपने अन्य पक्षांतील आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला व त्यांच्या मदतीने राज्यांमध्ये सरकार स्थापन केले. त्यानंतर, भाजपच्या सत्तेच्या खेळीला ‘कमळ मोहीम’ अशी दूषणे विरोधी पक्षांनी दिली. त्याच धर्तीवर पवन खेरा यांनी गोव्यातील काँग्रेसच्या आमदारांच्या भाजप प्रवेशाला ‘चिखल मोहीम’ म्हटले आहे! काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या पक्षाच्या आमदारांनी लोकांच्या विश्वासावर विधानसभेची निवडणूक लढवली होती पण, भाजपच्या दबावाला बळी पडून त्यांनी पक्षाचा त्याग केला आहे. वैचारिक बांधलकी वाऱ्यावर सोडून, संघर्ष करायला-तुरुंगात जायला घाबरणारे नेते भाजपमध्ये जातात, अशी टीका प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी केली.

काँग्रेसपाठोपाठ आता ‘आप’नेही भाजपवर पंजाबमध्ये पक्षातून १० आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. आपच्या आमदारांना २०-२५ कोटींचे लालूच दाखवले जात असून सत्ताधारी पक्षातील आमदारांना विकत घेऊन राज्यातील बिगरभाजप सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप ‘आप’चे प्रमुख अरिवद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा दावा करत ‘आप’ सरकारने दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला होता. दिल्ली व पंजाबमध्ये भाजपचे फोडाफोडीचे राजकारण यशस्वी झाले नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या पक्षांतर्गत कमकुवतपणावर टीका

भाजपला ‘आप’चे आमदार पक्षातून फोडण्यात यश आले नाही पण, काँग्रेसचे आमदार मात्र भाजपच्या कमळ मोहिमेचे सहजपणे शिकार कसे होऊ शकले, असा सवालही उपस्थित करून केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत कमकुवतपणावर टीका केली आहे. गोव्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मते देणे म्हणजे भविष्यातील ‘भाजपच्या आमदारा’ला मतदान करण्याजोगे असते. ८ आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसकडे आता फक्त ३ आमदार उरले आहेत. केजरीवाल यांनी मंगळवारी काँग्रेस पक्ष संपुष्टात आला असल्याची टीकाही केली होती.